२८ हजार केशरी शिधापत्रिकाधारकांना मिळणार सवलतीत धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:27 AM2021-05-28T04:27:10+5:302021-05-28T04:27:10+5:30
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मागील दीड महिन्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचा सर्वात माेठा फटका गरीब नागरिकांना बसला आहे. ...
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मागील दीड महिन्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचा सर्वात माेठा फटका गरीब नागरिकांना बसला आहे. या वर्गाला आधार देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने मे महिन्यात धान्याचे माेफत वितरण केले. तसेच केंद्र शासनानेही मे व जून महिन्यात माेफत धान्य वितरण करण्याचा निर्णय घेतला व या धान्याचे वितरण आता सुरू आहे.
या दाेन्ही याेजनांचा लाभ नियमित लाभार्थ्यांनाच दिला जात हाेता. ज्यांच्याकडे केशरी शिधापत्रिका आहे. मात्र ते प्राधान्य कुटुंबात माेडत नाही हे लाभार्थी मात्र या याेजनेपासून वंचित हाेते. हे लाभार्थी सुद्धा गरीबच आहेत. त्यांनाही लाभ देण्याची मागणी हाेत हाेती. राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबतची घाेषणा करताना केशरी शिधापत्रिकारधारकांनाही सवलतीत धान्य वितरण करण्याची घाेषणा केली आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडे असलेल्या नाेंदीनुसार गडचिराेली जिल्ह्यात एपीएलचे २८ हजार ८७८ कुटुंब आहेत. त्यांना या याेजनचा लाभ दिला जाणार आहे.
बाॅक्स
-या याेजनचा लाभ घेण्यासाठी संबंधित शिधापत्रिकेवरील लाभार्थ्यांचे आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. आजपर्यत या शिधापत्रिकाधारकांना धान्यच मिळत नसल्याने अनेकांनी आधारकार्ड लिंंकच केले नाही. त्यामुळे असे नागरिक या याेजनेपासून वंचित राहणार आहेत.
- ८ रूपये किलाे गहू व १२ किलाे तांदूळ या दराने धान्य दिले जाणार आहे. एवढ्या दराने फार कमी नागरिक या याेजनेचा लाभ घेण्याची शक्यता आहे.
बाॅक्स
जून मध्येही मिळणार दाेनवेळा लाभ
राज्य शासनाने मे महिन्यात माेफत धान्य वितरण केले. तसेच केंद्र शासनानेही मे व जून महिन्यात माेफत धान्य वितरण करण्याचा निर्णय घेतला. केंद्राच्या मे महिन्याच्या धान्याचे वितरण आता सुरू आहे. जून महिन्यातही केंद्र शासनाकडून माेफत व राज्य शासनाकडून नियमित दराने धान्याचे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे मे बराेबरच जून महिन्यातही दाेनवेळा लाभ दिला जाणार आहे.
काेट
जून महिन्यात प्राधान्य कुटुंबात नसलेल्या केशरी लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्याचे आदेश राज्यशासनाकडून प्राप्त झाले आहेत. ८ रूपये किलाे गहू व १२ रूपये किलाे तांदूळ या दराने वितरण केले जाणार आहे.
नरेंद्र भागडे, जिल्हा पुरवठा अधिकारी
एकूण रेशनकार्डधारक-२,२६,५८८
बीपीएल-३१,२००
अंत्याेदय-९२,१३४
केशरी (प्राधान्य कुटुंब)-६७,६७९
काय मिळणार
प्रती व्यक्ती
२ किलाे गहू
३ किलाे तांदूळ