२८३ शिक्षक अतिरिक्त
By admin | Published: March 25, 2017 02:12 AM2017-03-25T02:12:34+5:302017-03-25T02:12:34+5:30
सप्टेंबर २०१६ मध्ये करण्यात आलेल्या संच मान्यतेनुसार विषय शिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापकांचे चार दिवसांपूर्वी
४३४ जागा रिक्त : २६ पासून समायोजन प्रक्रियेला प्रारंभ
गडचिरोली : सप्टेंबर २०१६ मध्ये करण्यात आलेल्या संच मान्यतेनुसार विषय शिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापकांचे चार दिवसांपूर्वी समायोजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाभरात ४३४ शिक्षकांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांवर अतिरिक्त झालेल्या २८३ शिक्षकांचे समायोजन केले जाणार आहे. समायोजनाची प्रक्रिया २६ व २७ मार्च रोजी राबविली जाणार आहे.
बदल्यांपूर्वी दरवर्षी समायोजनाची प्रक्रिया राबविली जात आहे. दरवर्षी पटसंख्या घटत चालली असल्याने विद्यार्थी संख्या कमी पडत आहे. त्यामुळे आरटीईच्या निकषानुसार मुख्याध्यापकाचे पद बसण्यासाठी आवश्यक असलेली किमान १५० ची पटसंख्या कमी होत चालली आहे. परिणामी दरवर्षी मुख्याध्यापकांची संख्या घसरत आहे. मागील शैक्षणिक सत्रात मुख्याध्यापकांच्या १६६ मुख्याध्यापकांची पदे मंजूर होती. मात्र चालू वर्षात पटसंख्या घसरल्याने केवळ ८५ मुख्याध्यापकांच्या पदांना मान्यता मिळाली. तर उर्वरित मुख्याध्यापकांना अध्यापनाचे काम करावे लागले. मुख्याध्यापकांच्या समायोजनानंतर रविवार व सोमवारी ४७६ पदवीधर शिक्षक व विषय शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. यानंतर आता २६ व २७ मार्च रोजी प्राथमिक शिक्षकांचे समायोजन केले जाणार आहे. २६ तारखेला तालुक्यांतर्गत समायोजन होईल. तर २७ तारखेला तालुक्याबाहेर समायोजन केले जाणार आहे. जिल्ह्यातील बाराही तालुक्यांमध्ये एकूण २८३ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. तर ४३४ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. यामध्ये माध्यमिकच्या ३० जागा रिक्त आहेत. तर २४ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. हिंदी माध्यमाचे नऊ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. हिंदी माध्यमामध्ये एकही जागा शिल्लक नाही. चामोर्शी व मुलचेरा तालुक्यात बंगाली माध्यमाच्या शाळा आहेत. मुलचेरा तालुक्यात बंगाली माध्यमाच्या १३ जागा रिक्त आहेत. तर चार शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. चामोर्शी तालुक्यात सहा जागा रिक्त आहेत. तर ११ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. अतिरिक्त शिक्षकांच्या तुलनेत रिक्त जागा अधिक असल्याने १५१ शिक्षकांच्या जागा रिक्त राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. रिक्त जागांवर इतर जिल्ह्यातून अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांची वर्णी लावली जाते. समायोजनेला मोठी गर्दी उसळणार आहे. (नगर प्रतिनिधी)
जागा रिक्त राहण्याचा धोका
अतिरिक्त शिक्षकांच्या तुलनेत रिक्त जागांची संख्या अधिक आहे. त्यामुळे समायोजनादरम्यान जवळपास १५१ जागा रिक्त राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.
समायोजन प्रक्रियेनंतर आणखी प्रत्येक तालुक्यातील रिक्त व अतिरिक्त शिक्षकांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर मे महिन्यामध्ये बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे. बदलीदरम्यान प्रशासकीय व विनंती बदल्या केल्या जातात.
चार वर्षांपूर्वी शिक्षक बदली प्रक्रियेतील घोटाळा उघडकीस आला होता. सदर घोटाळा आजही चर्चेत आहे. जिल्हा परिषदेच्या तीन कर्मचाऱ्यांना तुरूंगाची हवा खावी लागली. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील बदली प्रक्रिया अतिशय संवेदनशील मुद्दा मानला जातो. या बदली घोटाळ्यात चार ते पाच लाख रूपये शिक्षकांनी अधिकारी व जिल्हा परिषदेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांना दिले होते. तरीही बदल्या झाल्या नाही. पैसे मात्र बुडले. तेव्हापासून शिक्षक वर्ग पैसे देऊन बदली करण्याच्या नादात पडत नसल्याचे दिसून येत आहे.