२९,५९७ शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा
By admin | Published: June 13, 2017 12:38 AM2017-06-13T00:38:53+5:302017-06-13T00:38:53+5:30
शेतकऱ्यांच्या बहुचर्चित संप-आंदोलनानंतर सरकारने सरसकट कर्जमाफी देण्याचे तत्त्वत: मान्य केले आहे.
१५२ कोटींची थकबाकी : अल्प व अत्यल्प भूधारकांच्या नवीन कर्जाचा मार्ग होणार मोकळा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शेतकऱ्यांच्या बहुचर्चित संप-आंदोलनानंतर सरकारने सरसकट कर्जमाफी देण्याचे तत्त्वत: मान्य केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २९ हजार ५९७ शेतकऱ्यांकडे असलेले १५२ कोटी ४ लाख रुपयांचे थकीत कर्ज माफ होण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यात अल्पभूधारकांना तातडीने कर्जमाफीचा लाभ देण्याचे जाहीर करण्यात आले असले तरी सोमवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत त्याबाबतचा आदेश बँकांकडे पोहोचलेला नव्हता.
खरीप हंगामाला सुरूवात झाल्यामुळे आणि पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र जुन्या थकित कर्जामुळे नवीन हंगामासाठी कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकरी वैतागले होते. आता अल्प व अत्यल्पभूधारकांना ही कर्जमाफी लगेच लागू करण्याचे जाहीर झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
मार्च २०१७ पर्यंतच्या थकित कर्जाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास जिल्ह्यात सर्वाधिक २१ हजार २२१ शेतकरी ५० हजारापर्यंत कर्ज थकित असणारे आहेत. १ लाखापर्यंत कर्ज थकित असणारे ७ हजार १६७ शेतकरी, तर १ लाख ५० हजारापर्यंत कर्ज थकबाकी असणारे १ हजार २०९ शेतकरी आहेत. शेतकऱ्यांना सर्वाधिक कृषी कर्ज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वाटप केले आहे. त्यामुळे या बँकेची थकबाकी सर्वाधिक ४८.७० कोटी रुपये आहे. त्या खालोखाल स्टेट बँक आॅफ इंडियाच्या कृषी कर्जाची थकबाकी ४५.६९ कोटी आहे. इतर राष्ट्रीयकृत बँकांचे कर्जवाटप आणि थकबाकीही कमी आहे.
एकूण थकबाकीदार शेतकऱ्यांमध्ये अत्यल्पभूधारक शेतकरी १० हजार ५५३ असून त्यांच्याकडे २९ कोटी ५ लाखांची थकबाकी आहे. अल्पभूधारक शेतकरी ११ हजार ४६२ आहे. त्यांच्याकडे ५५ कोटी ४३ लाखांची थकबाकी आहे, तर इतर मोठे शेतकरी ७५८४ असून त्यांच्याकडे ६७ कोटी ५६ लाखांची थकबाकी आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर आता कर्जमाफी होणारच असा विश्वास अनेकांना होता. पण सरकार आढेवेढे घेत असल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता.
आता एकदाची कर्जमाफी जाहीर केल्यामुळे पुढची प्रक्रियाही लवकरात लवकर करावी आणि नव्याने कर्ज देऊन खरीप हंगामाची सोय करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे ८४.४८ कोटींची थकबाकी
जिल्ह्यात मार्च २०१७ पर्यंत कर्ज थकबाकी असणारे अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी २२ हजार १३ आहेत. त्यांच्याकडे ८४.४८ कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी तातडीने माफ केली जाणार असल्याचे घोषणा झाल्यामुळे या शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे. शासनाचा आदेश पोहोचताच या शेतकऱ्यांंना ‘नो ड्यू’ प्रमाणपत्र मिळण्याचा आणि नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शेतकऱ्यांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन बँकांनी योग्य व्यवस्था करणे गरजेचे आहे.
आंदोलने शांत
राज्यात शेतकऱ्यांचा संप तीव्र होत असताना सुरूवातीचे चार दिवस गडचिरोली जिल्ह्यात या संपाचा कोणताही परिणाम दिसत नव्हता. त्यानंतर शिवसेनेने दररोज एका-एका तालुक्यात रास्ता रोको आंदोलन सुरू केले. यानंतर काँग्रेस पक्षानेही अधिकाऱ्यांना निवेदने देऊन संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटपर्यंत या आंदोलनात आपले अस्तित्व दाखविले नाही.
कर्जमाफीची घोषणा होत नसल्याचे पाहून काँग्रेसने रस्त्यावरून उतरून आंदोलन करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र त्यांना ती संधी मिळालीच नाही. रविवारी कर्जमाफीच्या निर्णयानंतर सर्वांचीच आंदोलने शांत झाली. त्यातच दोन दिवसांपासून पावसाचे आगमन होत असल्याने आंदोलनापाठोपाठ वातावरणही थंड झाले आहे.