गडचिरोली व देसाईगंजमध्ये २९ इमारती धोकादायक
By admin | Published: June 13, 2014 12:08 AM2014-06-13T00:08:33+5:302014-06-13T00:08:33+5:30
गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज व गडचिरोली या दोन नगर पालिका क्षेत्रात २९ इमारती धोकादायक असल्याची माहिती पुढे आली आहे. यातील चार इमारती या अतिशय धोकादायक असल्याची माहिती
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज व गडचिरोली या दोन नगर पालिका क्षेत्रात २९ इमारती धोकादायक असल्याची माहिती पुढे आली आहे. यातील चार इमारती या अतिशय धोकादायक असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाने दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज व गडचिरोली दोन नगर पालिकांतर्गत २९ धोकादायक इमारती आहेत. यामध्ये १० इमारती गडचिरोली शहरात आहेत. तर १९ इमारती देसाईगंजमध्ये आहेत. यातील चार या अतिशय धोकादायक आहेत. प्रत्येक पावसाळ्याच्यावेळी सदर इमारत मालकांना नोटीस बजाविली जाते. या पलिकडे कोणतीही कारवाई केली जात नाही. गडचिरोली नगर पालिकेने दोन वर्षापूर्वी एक इमारत पाडली. ज्या नागरिकांनी इमारती संदर्भात तक्रार दिली किंवा माहिती दिली तरच अशा ठिकाणी पालिका प्रशासनान जाऊन पोहोचते व त्या इमारतीची पाहणी करून तिच्या पाडण्याबाबतचा निर्णय घेतला जातो.
सध्यातरी या २९ इमारतींसह जिल्ह्यातील १२ तालुक्यात १२५ ते १५० इमारती या जीर्णावस्थेत असल्याच्या नोंदी त्या-त्या ग्रामपंचायतीकडे आहेत. परंतु गावतपातळीवर इमारत पाडण्याचे काम ग्रामपंचायतीची यंत्रणा करत नाही. अनेक इमारतींना टेकू लावून त्या इमारती तशाच ठेवल्या जातात. व पावसाळ्याच्या दिवसात भिंत कोसळून होणाऱ्या मृत्यूच्या घटनांना अशा इमारती कारणीभूत ठरतात. सिरोंचा तालुका मुख्यालयाच्या ठिकाणीही अनेक जुन्या इमारती आहेत. जिल्ह्यात अनेक शाळा अजूनही अशा इमारतीत चालतात. ग्रामीण भागात अनेक घरे मातीचे असून पावसाळ्याच्या दिवसात मातीच्या भिंती ओल्या होऊन कोसळू नये याकरीता या भिंतींना तुराट्यांचे कडे बांधले जातात. तसेच अनेक ठिकाणी फाटे लावून भिंतींना आधार दिला जातो. त्यामुळे ग्रामीण भागात मोडकळीस आलेल्या इमारती पाडण्याची कारवाई होत नाही. गडचिरोली व देसाईगंज नगर पालिकेच्या क्षेत्रातच २९ इमारती मोडकळीस आलेल्या व धोकादायक आहेत. गतवर्षी आरमोरी तालुक्यात पावसाळ्याच्या दिवसात भिंत कोसळून इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. गडचिरोली शहरात व देसाईगंमध्ये अशा इमारती अधिक असल्याने येथे पावसाळ्यापूर्वी पाडण्याची कारवाई होण्याची आवश्यकता आहे. परंतु नगर पालिका प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे दिसते. (जिल्हा प्रतिनिधी)