शेततळ्यांसाठी ३ कोटी ९० लाख प्राप्त
By Admin | Published: May 29, 2016 01:31 AM2016-05-29T01:31:00+5:302016-05-29T01:31:00+5:30
राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी योजना म्हणून हाती घेतलेल्या मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत गडचिरोली
४ हजार २०७ शेतकऱ्यांनी केले अर्ज : ८०० शेतकऱ्यांना अनुदान पुरणार
गडचिरोली : राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी योजना म्हणून हाती घेतलेल्या मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याला यंदा १ हजार ३४० शेततळे बांधण्याचे उद्दिष्ट दिले आहे. राज्य शासनाकडून या शेततळ्याच्या अनुदानासाठी गडचिरोलीच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला ३ कोटी ९० लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातून एकूण ४ हजार २०७ शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर केले. अत्यल्प पाऊस व रखडलेले सिंचन प्रकल्प यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. गतवर्षीच्या खरीप हंगामात दुष्काळामुळे हजारो शेतकरी हवालदिल झाले. या दुष्काळ परिस्थितीवर मात करून शेतकऱ्यांना दिलास देण्यासाठी भाजपप्रणीत राज्य सरकारने यावर्षीपासून मागेल त्याला शेततळे ही योजना हाती घेतली आहे.
सिंचन क्षेत्र वाढावे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्यांसाठी राज्य शासनाकडून एकूण ३ कोटी ९० लाख रूपये पहिल्या टप्प्यात कृषी विभागाला प्राप्त झाले आहेत.
गडचिरोली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ३६ लाख ५० हजार, धानोरा तालुक्यासाठी ३६ लाख ५० हजार, चामोर्शी ४३ लाख ५० हजार, मुलचेरा २९ लाख, देसाईगंज १५ लाख, आरमोरी ३७ लाख, कुरखेडा ३५ लाख, कोरची २९ लाख, अहेरी ४० लाख ५० हजार, एटापल्ली ४० लाख ५० हजार, भामरागड २३ लाख ५० हजार व सिरोंचा तालुक्यातील शेततळ्यांसाठी २३ लाख ५० हजार रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गडचिरोली यांनी सदर निधी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे वर्ग केला आहे.
३ कोटी ९० लाख रूपयांच्या या निधीतून ८०० शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रूपये यानुसार अनुदान मिळणार आहे. या निधीतून जिल्ह्यात जवळपास ८०० शेततळ्यांचे काम पूर्ण होणार आहे.
(स्थानिक प्रतिनिधी)