शारीरिक चाचणीत ३ हजार ९६३ उमेदवार पात्र
By admin | Published: November 13, 2016 02:05 AM2016-11-13T02:05:05+5:302016-11-13T02:05:05+5:30
गडचिरोली वनवृत्ताच्या वतीने अनुसूचित क्षेत्रातील (पेसांतर्गत) वनरक्षकाच्या ६६ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
वनरक्षक पदाची भरती : पेसा क्षेत्रातील गावे
गडचिरोली : गडचिरोली वनवृत्ताच्या वतीने अनुसूचित क्षेत्रातील (पेसांतर्गत) वनरक्षकाच्या ६६ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सदर भरतीसाठी ६ हजार ४५५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. शारीरिक पात्रता तपासणी व धावण्याच्या चाळणी परीक्षेत २ हजार १२७ पुरूष व १ हजार ८३६ महिला अशा एकूण ३ हजार ९६३ उमेदवार ३० मिनिटात अंतर पार करून शारीरिक चाळणी परीक्षेत पात्र ठरले आहेत, अशी माहिती प्रादेशिक निवड समितीचे सदस्य सचिव तथा गडचिरोलीच्या उपवनसंरक्षकांनी लोकमतला दिली आहे.
पुरूष उमेदवारांसाठी ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान शारीरिक पात्रता तपासणी व पाच किमी धावण्याची चाळणी चाचणी घेण्यात आली. महिला उमेदवारांसाठी ९ ते १० नोव्हेंबरदरम्यान शारीरिक पात्रता व धावण्याची चाळणी चाचणी घेण्यात आली. या चाचणीला ३ हजार ६७ पुरूष व १ हजार ९२२ महिला उमेदवार उपस्थित झाले. यापैकी २ हजार ७२७ पुरूष व १ हजार ८९२ महिला उमेदवार शारीरिक दृष्ट्या पात्र ठरले. यामध्ये २ हजार १२७ पुरूष व १ हजार ८३६ महिला अशा एकूण ३ हजार ९६३ उमेदवारांनी ३० मिनिटात अंतर पार केले व सदर उमेदवार शारीरिक क्षमता व धावण्याच्या चाळणीत पात्र ठरले.
६६९ पुरूष व ५६ महिला असे एकूण ७२५ उमेदवार शारीरिक क्षमता व धावण्याच्या चाळणी चाचणीत अपात्र ठरले आहेत. सदर पात्र व अपात्र उमेदवारांची यादी उपवनसंरक्षक गडचिरोली वन विभाग यांच्या कार्यालयीन नोटीस बोर्डावर १२ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. यावर कुणाला आक्षेप घ्यायचा असल्यास त्यांनी १७ नोव्हेंबरपर्यंत समितीकडे अर्ज करावेत. (प्रतिनिधी)