दारू वाहतूक करणाऱ्याला ३ वर्षांचा सश्रम कारावास
By गेापाल लाजुरकर | Published: May 17, 2024 10:10 PM2024-05-17T22:10:10+5:302024-05-17T22:10:46+5:30
२५ हजारांच्या दंडाची शिक्षा : चामाेर्शी न्यायालयाचा निर्वाळा
गडचिराेली : अवैधरित्या दारूची वाहतूक करताना आढळून आलेल्या चामाेर्शी तालुक्यातील एका दारू वाहतूकदाराला ३ वर्षांचा सश्रम करावास व २५ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा चामाेर्शी न्यायालयाने ठाेठावली. न्यायदंडाधिकारी (प्रथम श्रेणी) एन.डी. मेश्राम यांनी १५ मे राेजी याबाबत निर्वाळा दिला.
राजू देवराव पवार रा. राजूर ता. चामाेर्शी, असे शिक्षा झालेल्या आराेपीचे नाव आहे. आराेपी जालींदर विक्रम राठोड रा. पांढरीभटाळ, ता. चामाेर्शी व राजू देवराव पवार हे दाेघेही २५ ऑगस्ट २०१७ राेजी एम.एच. ३३- ३३७४ क्रमांकाच्या दुचाकीवर चुंगडीमध्ये दारूच्या बाटल्या भरून अवैधरित्या दारूची वाहतूक करताना पाेलिसांना आढळले हाेते. त्यानुसार पाेलिसांनी आरोपींविरूद्ध कलम ६५ (अ) व कलम ८३ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांन्वये गुन्हा नोंद केला. तपासाअंती आरोपींविरुध्द सबळ पुरावा मिळाल्याने आरोपींविरुध्द दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले. केसच्या दरम्यान आरोपी जालींदर राठाेड याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्याविरूद्धचे प्रकरण अबेट करण्यात आले. दुसरा आराेपी राजू पवार याच्या विराेधातील आरोप पत्र तयार करून सुनावणी झाली. सखोल युक्तीवादानंतर १५ मे राेजी आरोपीस कलम ६५ (अ) व कलम ८३ मध्ये प्रत्येकी ३ वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.
दंड न भरल्याने ३ महिन्यांनी शिक्षा वाढली
आराेपी राजू पवार याने दंड न भरल्याने अतिरिक्त ३ महिन्यांच्या सक्षम कारावासाचीही शिक्षा आरोपीस सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता एस. एम. सलामे यांनी युक्तीवाद केला. तसेच कोर्ट पैरवी पाेलिस शिपाई टी. आर. भोगाडे यांनी केली. या गुन्ह्याचा तपास पाेलिस हवालदार प्रभाकर भंडारे यांनी केला.