माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ३० टक्के उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:56 AM2021-01-08T05:56:30+5:302021-01-08T05:56:30+5:30
गडचिराेली : राज्य शासनाच्या निर्णयानुसार २३ नाेव्हेंबर २०२० पासून गडचिराेली जिल्ह्यासह राज्यभरातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग शाळांमध्ये प्रत्यक्ष ...
गडचिराेली : राज्य शासनाच्या निर्णयानुसार २३ नाेव्हेंबर २०२० पासून गडचिराेली जिल्ह्यासह राज्यभरातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग शाळांमध्ये प्रत्यक्ष भरविले जात आहेत. गडचिराेली जिल्ह्यात सर्व शाळांचे मिळून १६ हजार ४०० विद्यार्थी उपस्थित राहून असून विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण ३० टक्के आहे.
गडचिराेली जिल्ह्यात बाराही तालुके मिळून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळांची एकूण संख्या २९५ आहे. यापैकी काेविड नियमाचे पालन करत २८६ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सर्व माध्यमिक शाळांची नववी ते बारावीची एकूण विद्यार्थीसंख्या ४६ हजार ५५० इतकी आहे. यापैकी सद्य:स्थिती १६ हजार ४०० विद्यार्थी शाळांमध्ये उपस्थित राहत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या दीड महिन्यांपासून विद्यार्थी शाळांमध्ये जाऊन प्रत्यक्ष शिक्षणाचे धडे घेत आहेत. मात्र, दीड महिन्यांच्या कालावधीत एकही विद्यार्थी काेराेनाबाधित आढळला नाही.
बाॅक्स
उपस्थितीचे प्रमाण वाढण्याची शक्यता
नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असून एकही विद्यार्थी काेराेनाबाधित आढळला नाही. आता गेल्या आठ दिवसांपासून काेराेनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी हाेत आहे. रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे जानेवारी अखेरीपासून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तसा आशावाद शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.
काेट
गेल्या दीड महिन्यांपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष भरविले जात आहेत. दीड महिन्यांत एकही विद्यार्थी काेराेनाबाधित निघाला नाही. काेराेनाबाबत सर्व शाळांमध्ये आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांनी पालकांच्या सभा घेऊन त्यांच्या मनातील काेराेनाची भीती दूर केली पाहिजे. पालकांनीही भीती न बाळगता आपल्या पाल्यांना शाळेत पाठवावे.
-आर. पी. निकम, शिक्षणाधिकारी माध्यमिक, गडचिराेली