मरपल्लीत ३० लाखांचा शौचालय घोटाळा उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 01:18 AM2018-06-30T01:18:15+5:302018-06-30T01:19:43+5:30

अहेरी तालुक्यातील मरपल्ली ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक एच. एस. भारूडे यांनी सुमारे २९ लाख ५२ हजार ७४० रूपयांचा घोटाळा केला आहे. अहेरीचे पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी यांनी केलेल्या चौकशीत सदर घोटाळा उघड झाला आहे.

30 lakh toilere scandal exposed in Marpoli | मरपल्लीत ३० लाखांचा शौचालय घोटाळा उघड

मरपल्लीत ३० लाखांचा शौचालय घोटाळा उघड

Next
ठळक मुद्देचौकशी अहवालात स्पष्ट : तत्कालीन ग्रामसेवकाचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्क
जिमलगट्टा : अहेरी तालुक्यातील मरपल्ली ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक एच. एस. भारूडे यांनी सुमारे २९ लाख ५२ हजार ७४० रूपयांचा घोटाळा केला आहे. अहेरीचे पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी यांनी केलेल्या चौकशीत सदर घोटाळा उघड झाला आहे.
मरपल्ली ग्रामपंचायतीत शौचालय बांधकामात गैरव्यवहार झाला असून याची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य यशवंत डोंगरे यांनी कोत्तागुडम पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार विस्तार अधिकारी यांनी ३१ मे ते १ जून २०१८ या कालावधीत प्रत्यक्ष बांधकामाची पाहणी केली. पाहणीदरम्यान मरपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या करंचा व भस्वापूर येथील एकूण ११५ शौचालये आराखड्यानुसार बांधण्यात आली नाही. नियमानुसार दोन खड्ड्यांचे खोदकाम व बांधकाम झाले नाही. फक्त जागेवरूनच शौचालयाच्या भिंती उचलण्यात आल्या आहेत. शौचालयांना दरवाजे नाहीत. सिट बसविली आहे, परंतु छत नाही. सर्व शौचालय अपूर्णावस्थेत आढळली. मरपल्ली व कोतागुडम या गावांमध्ये कोणतेही बांधकाम झाले नाही. लाभार्थी स्वत: बांधकाम करण्यास इच्छुक असतानाही ग्रामसेवक भारूडे यांनी स्वत:च रेतीचा व साहित्याचा पुरवठा केला, परंतु बांधकाम सुरू केले नाही, अशी माहिती लाभार्थ्यांनी दिली.
बांधकामासंदर्भातील आवश्यक दस्तावेज सादर करण्याचे निर्देश भारूडे यांना देऊन सुध्दा त्यांनी साहित्य खरेदीचे देयके, प्रमाणके, साठाबंदी व नमुना-२२ व इतर कोणतेही दस्तावेज सादर केले नाहीत. भारूडे यांनी नियमबाह्यपणे स्वत:च सिमेंट, रेती, विटा, दरवाजे, सिट आदी साहित्य खरेदी केले. खरेदी केलेल्या साहित्याची साठापंजीमध्ये नोंद नाही. कोणतेही बिल न घेताच बालाजी ट्रेडर्स, रोहित ट्रेडर्स, कल्याणी ट्रेडर्स, राकेश ट्रेडर्स या पुरवठाधारकांना २५ लाख ५५ हजार ४४० रूपयांचे धनादेश प्रदान केले आहे. मजुरीवर ३ लाख ९७ हजार ३०० रूपयांचा खर्च दाखविला आहे. परंतु मजुरी वाटपाचे नमुना-२२ सादर केले नाही. यावरून केलेला खर्च नियमबाह्य आहे. भारूडे यांनी २९ लाख ५२ हजार ७४० रूपयांच्या रकमेची अफरातफर केल्याचे सिध्द होत असल्याने त्यांच्या विरूध्द शासन निर्णयानुसार कारवाई प्रस्तावित करावी, असे चौकशी अहवालात म्हटले आहे.
चौकशी न करताच ग्रामपंचायतीला दिला निधी
भारूडे यांनी २४९ शौचालयांची बांधकामे पूर्ण दाखवून निधीची मागणी केली. निधी प्रस्तावासोबत लाभार्थ्यांची यादी सादर केली नाही. संख्या दाखवून प्रस्ताव सादर केला. तरीही अहेरीच्या गट समन्वयकांनी २९ लाख ८८ हजार रूपयांची देयके सहा टप्प्यात वितरित केली. प्रत्यक्षात शौचालय बांधकामाची पाहणी करूनच निधीचे वितरण करणे ही जबाबदारी समूह समन्वयक व गट समन्वयक यांची होती. मात्र त्यांनी चौकशी न करताच निधी दिला.

मरपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत शौचालय बांधकामात गैरव्यवहार झाला आहे. यामध्ये ग्रामसेवकासह सरपंच सुध्दा जबाबदार आहेत. चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आजच पाठविला आहे. त्यांच्याकडून उत्तर आल्यानंतर ग्रामसेवक व सरपंच या दोघांविरोधातही एफआयआर दाखल केला जाईल.
-प्रफुल्ल म्हैसकर,
संवर्ग विकास अधिकारी, अहेरी

Web Title: 30 lakh toilere scandal exposed in Marpoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.