साहित्यासाठी ३० लाखांचा निधी
By admin | Published: December 26, 2016 01:33 AM2016-12-26T01:33:16+5:302016-12-26T01:33:16+5:30
शैक्षणिक साहित्याच्या मदतीने अध्यापन केल्यास आनंददायी अध्यापन होऊन विद्यार्थ्यांचेही लक्ष टिकून राहते.
चार वर्षांनंतर अनुदान मिळाले : शैक्षणिक सामुग्रीच्या खरेदीसाठी शिक्षकांना मदत
गडचिरोली : शैक्षणिक साहित्याच्या मदतीने अध्यापन केल्यास आनंददायी अध्यापन होऊन विद्यार्थ्यांचेही लक्ष टिकून राहते. यासाठी अध्यापन करताना शैक्षणिक साहित्याचा जास्तीत जास्त वापर करावा, असे निर्देश शिक्षकांना देण्यात आले आहेत. शिक्षकांना साहित्य खरेदीसाठी सोयीचे व्हावे, यासाठी तीन वर्षांच्या खंडानंतर यावर्षी पहिल्यांदाच प्रती शिक्षक ५०० रूपये अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्हाभरातील शिक्षकांना सुमारे ३० लाख २० हजार रूपयांच्या अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे.
भाषण पध्दतीने अध्यापन केल्यास सदर अध्यापन रटाळ होऊन विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होण्याचा धोका राहतो. त्याचबरोबर विद्यार्थी जास्तवेळ लक्ष केंद्रीतही करू शकत नाही. कोणताही पाठ मात्र शैक्षणिक साहित्याच्या मदतीने अध्यापन केल्यास विद्यार्थ्यांसाठी तो आनंददायी पाठ ठरतो. त्यामुळे अधिकाधिक शैक्षणिक साहित्य वापरावे, असा सल्ला शिक्षण तज्ज्ञांकडून दिला जातो. मात्र प्रत्येकच शैक्षणिक साहित्य खरेदी करणे शिक्षकाला शक्य होत नाही. यासाठी शासनाकडून थोडी फार आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. यासाठी तीन वर्षांपूर्वी पर्यंत शैक्षणिक साहित्यासाठी अनुदान वितरित केले जात होते. मात्र मागील तीन वर्षांपासून सदर प्रकारचे अनुदान देणे बंद करण्यात आले होते.
मागील वर्षीपासून शासनाने रचनावादाप्रमाणे अध्यापन करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमही राबविले जात आहेत. त्यामुळे शैक्षणिक साहित्य खरेदी करणे आवश्यक होते. शासनाने पूर्वीप्रमाणे साहित्य खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिक्षकांकडून केली जात होती. त्यानुसार शिक्षकांना शासनाने अनुदान उपलब्ध करून दिले आहे. (नगर प्रतिनिधी)
भाषा व गणितावर भर
ग्रामीण भागातील विद्यार्थी भाषा व गणित या दोन विषयांमध्ये अत्यंत मागे असल्याचे दिसून येते. त्यातही भाषेमध्ये इंग्रजी हा विषय विद्यार्थ्यांच्या डोक्याच्या वरून जातो. समजत नाही म्हणून विद्यार्थी याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे इंग्रजीची समस्या गंभीर बनते. शिक्षकांनी इंग्रजी हा विषय शैक्षणिक साहित्यांच्या माध्यमातून शिकवावा. त्याचबरोबर गणितासाठी आनंददायी अशी शैक्षणिक साहित्य तयार करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
या अनुदानाला लोक सहभागातून मिळणाऱ्या निधीची जोड देऊन शाळा डिजीटल करावी, वर्गखोल्या रचनावादी अध्यापन पध्दतीप्रमाणे सजवाव्यात, असेही निर्देश देण्यात आले आहेत.