दोन वाहनांसह ३१ लाख १४ हजारांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:06 AM2017-12-01T00:06:04+5:302017-12-01T00:06:31+5:30
तेलंगणा राज्यातून सिरोंचामार्गे दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात हजारांवर पेट्यांच्या दारूची तस्करी करणारे दोन वाहन जिल्हा पोलीस दलाच्या विशेष पथकाने पकडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : तेलंगणा राज्यातून सिरोंचामार्गे दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात हजारांवर पेट्यांच्या दारूची तस्करी करणारे दोन वाहन जिल्हा पोलीस दलाच्या विशेष पथकाने पकडले आहेत. दोन्ही वाहनासह ३१ लाख १४ हजार रूपयांची दारू अहेरी पोलिसांनी गुरूवारी जप्त केली. या कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील दारूतस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये अब्दुल सईद अब्दुल अजिज शेख (४७) रा. चंदनगर इंदौर (मध्यप्रदेश), धर्मा निमाई रॉय रा. चामोर्शी, राजू मुलन्ना रा. ट्रान्सपोर्ट नगर इंदौर (मध्यप्रदेश) तसेच ट्रक व टाटा सुमो वाहनाच्या चालक व मालकाचा समावेश आहे.
तेलंगणा राज्यातून दारूबंदीच्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची अवैध तस्करी होत असते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाच्या विशेष पथकाने गुरूवारी पहाटेच्या सुमारास अहेरी तालुक्यातील मोसम गावाजवळ सापळा रचला होता. यादरम्यान सिरोंचाकडून येत असलेल्या एमएच ३४, एए ००२५ या पायलट वाहनासह एमपी ०९, एचएफ ३३८१ या क्रमांकाच्या ट्रकला अडवून पोलीस पथकाने चौकशी केली. त्यावेळी दोन्ही वाहनात हजारांवर पेट्या विदेशी दारू आढळून आली. ही दारू जप्त करून पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे.
पोलिसांनी वाहनातून ८ लाख ६४ हजार रूपयांची दारू जप्त केली. या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या दोन्ही वाहनाची किंमत मिळून एकूण २२ लाख ५० हजार रूपये आहे.
विशेष म्हणजे, या कारवाईदरम्यान पकडण्यात आलेल्या एमएच ३४, एए ००२५ या क्रमांकाच्या वाहनावर शिवसेना व जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल या नावांचा उल्लेख आहे. त्यामुळे दारू तस्करीच्या या अवैध साम्राज्यात राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लागेबांधे असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अहेरी पोलीस ठाण्यात ट्रकमधून दारूच्या पेट्या उतरविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिसांनी नेमकी किती रूपयांची व किती पेट्या दारू जप्त केली, तसेच या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव व इतर आरोपी याबाबत कोणतीही माहिती पोलिसांकडून मिळाली नाही. सदर घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करण्याची पुढील कार्यवाही रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून सुरू होती.
पकडलेल्या वाहनाशी आपला संबंध नाही- चंदेल
अहेरी पोलिसांकडून दारू वाहतूक कारवाईदरम्यान काळ्या रंगाची ग्रँडी कंपनीचे जे चारचाकी वाहन अहेरी भागात पकडण्यात आले. त्या वाहनावर शिवसेना व जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल नावाचा स्टिकर चिटकविलेला होता. परंतु पकडलेले संबंधित वाहन हे आपल्या मालकीचे नाही, असे शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी म्हटले आहे. माझ्याकडे असलेले झायलो कंपनीचे काळ्या रंगाचेच वाहन आहे. त्या वाहनासमोर शिवसेना व मागे माझ्या नावाचा उल्लेख असलेला स्टिकर आहे. मला दुपारी २ वाजता व्हॉट्सअॅपवर आलेल्या व्हिडीओ क्लिपवरून समजले. माझ्या झायलो कंपनीच्या वाहनाचा नंबर एमएच-३१-सीएस-००८६ आहे. माझ्या नावाचा उल्लेख वाहनावर असल्याने मला मन:स्ताप झाला आहे. माझी गाडी बिघडल्याने गडचिरोली येथील गॅरेजमध्ये दुरूस्तीला ठेवण्यात आली आहे.