सिंचनासाठी ३११ बोड्यांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 11:39 PM2019-05-05T23:39:22+5:302019-05-05T23:40:02+5:30
धानाच्या पिकाला बोडीच्या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध होते. कमी जागेत बोडी तयार करता येणे शक्य असल्याने पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांकडून बोडी तयार करण्यासाठी अनुदान देण्याची मागणी केली जात होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : धानाच्या पिकाला बोडीच्या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध होते. कमी जागेत बोडी तयार करता येणे शक्य असल्याने पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांकडून बोडी तयार करण्यासाठी अनुदान देण्याची मागणी केली जात होती. २०१८-१९ या आर्थिक वर्षात ३११ बोड्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या बोड्यांच्या माध्यमातून एक हजार पेक्षा अधिक हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
भूजल पातळीत वाढ करण्याबरोबरच आकस्मिक स्थितीत पिकांना पाणी देता यावे, यासाठी राज्य शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये धानाचे पीक घेतले जाते. या पिकासासाठी अगदी सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत सिंचनाची गरज भासते. ही गरज शेततळा पूर्ण करू शकत नाही. त्यासाठी मामा तलाव किंवा बोडी असणे आवश्यक आहे.
त्यामुळे मागेल त्याला शेततळ्याच्या धर्तीवर मागेल त्याला बोडी देण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांकडून शासनाकडे होत होती. त्यानुसार राज्य शासनाने ११ सप्टेंबर २०१६ रोजी मागेल त्याला बोडी ही योजना आहे. पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याकरिता ४४० बोडी निर्माण करण्याचे लक्षांक प्राप्त झाले.
३१ मार्च २०१९ पर्यंत शेतकऱ्यांकडून २ हजार ३४ आॅनलाईन अर्ज मिळाले. त्यापैकी १ हजार ३४४ लाभार्थ्यांनी सेवाशुल्क भरले. १ हजार ५२ लाभार्थी निकषानुसार पात्र झाले आहेत. त्यापैकी ५०६ लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. ३११ बोडीची कामे पूर्ण सुध्दा झाली आहेत.
१०० बोड्यांना ३२ लाख २२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. पुन्हा काही शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार असल्याने अनुदान प्राप्त शेतकऱ्यांची संख्या एक हजारच्या जवळपास पोहोचणार आहे.
शेततळे कुचकामी
राज्य शासनाने मोठा गवगवा करून मागेल त्याला शेततळे देण्याचा उपक्रम राबविला आहे. या अंतर्गत १०० टक्के अनुदान दिले जात असल्याने काही शेतकºयांनी आपल्या शेतात शेततळे खोदले आहे. मात्र या शेततळ्यात जेव्हा पाऊस पडते, तेव्हाच पाणी राहते. पाऊस गेल्यानंतर पाणी राहत नाही. म्हणजेच जेव्हा गरज आहे, तेव्हा शेततळा कोरडा पडून राहत असल्याचा अनेक शेतकºयांना अनुभव आला आहे. विशेष म्हणजे, शेततळ्यासाठी जवळपास १० आर. जमीन लागते. शेततळ्याचा खड्डा खोदल्यामुळे तेवढ्या भागावर पीक घेणे शक्य होत नाही. अनेक शेतकऱ्यांचे शेततळे निकामी झाले आहेत. हा अनुभव आता शेतकऱ्यांना हळूहळू येत असल्याने शेतकऱ्यांनी शेततळे खोदण्याकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येते.
मामा तलावांची दुरूस्ती करा
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मामा तलाव आहेत. या तलावांच्या माध्यमातून धानाला सिंचन दिले जाते. मात्र शेकडो वर्षांपूर्वीच्या तलावांमध्ये आता गाळ साचला आहे. त्यामुळे त्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. काही मामा तलावांच्या पाळी, पाट फुटले आहेत. त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी आहे.