मोफत प्रवेशासाठी ३११ विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 01:28 AM2018-06-21T01:28:04+5:302018-06-21T01:28:04+5:30
बालकाचा मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (आरटीई) अंतर्गत जिल्ह्यातील खासगी विनाअनुदानित शाळा व कॉन्व्हेंटमध्ये इयत्ता पहिलीत एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बालकाचा मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (आरटीई) अंतर्गत जिल्ह्यातील खासगी विनाअनुदानित शाळा व कॉन्व्हेंटमध्ये इयत्ता पहिलीत एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. या शासकीय योजनेची अंमलबजावणी जि. प. शिक्षण विभाग (प्राथमिक) च्या वतीने सुरू करण्यात आली असून प्रवेशपात्र विद्यार्थी निवडीसाठी तिसऱ्या फेरीची मंगळवारी जि. प. सर्व शिक्षा अभियानाच्या कार्यालयात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यानुसार इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठी ३११ विद्यार्थ्यांची तिसºया टप्प्यात निवड करण्यात आली आहे.
सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात सदर योजना आॅनलाईन पद्धतीने राबविली जात असून या योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण ८३ शाळांमध्ये इयत्ता पहिलीत एकूण ८९७ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
सदर योजनेंतर्गत पाल्यांचा प्रवेश करून घेण्यासाठी सुरूवातीला ५ मार्च २०१८ पर्यंत पालकांना आॅनलाईनरित्या प्रवेश अर्ज सादर करावयाची मुदत होती. त्यानंतर ही मुदत वाढविण्यात आली.
२५ टक्के मोफत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या शाळांची यादी व त्या- त्या शाळेतील २५ टक्के मोफत प्रवेश क्षमता पाहण्यासाठी शासनाच्या वेबसाईटवर भेट द्यावी, असे आवाहन केले होते. या योजनेच्या अधिक माहितीसाठी तालुका स्तरावरील गटसाधन केंद्रामध्ये मदत केंद्र सुरू करण्यात आले. सदर योजनेंतर्गत वंचित गटातील एससी, एसटी व दिव्यांग मुलांना तसेच दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळतो. शासनाच्या निकषात बसणाऱ्या पालकांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकण्याची संधी या योजनेतून शासन उपलब्ध करून देत आहे. सदर योजनेंतर्गत गेल्या चार-पाच वर्षांपासून दुर्बल व वंचित घटकातील अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला.
मंगळवारी तिसऱ्या फेरीची सोडत चिमुकल्या बालकांच्या हस्ते काढण्यात आले. यावेळी प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथ.) पी.एच.उरकुडे, योजनेचे जिल्हा समन्वयक भाऊराव हुकरे, सहायक प्रकल्प अधिकारी राजू आकेवार, संगणक प्रोग्रामर प्रफुल मेश्राम आदी उपस्थित होते. मेश्राम यांनी सोडतीची संपुर्ण प्रक्रिया पार पाडली.
यंदा २५० वर जागा रिक्त राहणार
आरटीई २५ टक्के मोफत प्रवेश योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ८३ शाळांमध्ये २५ टक्के जागा रिक्त ठेवण्यात आल्या. २५ टक्क्यानुसार एकूण ८९७ जागा भरावयाच्या आहेत. यापूर्वी पहिली व दुसरी फेरीची सोडत काढण्यात आली. त्यानंतर ३४५ विद्यार्थ्यांच्या पालकांनी संबंधित इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश केला. त्यानंतर रिक्त जागांसाठी तिसऱ्या फेरीची सोडत काढण्यात आली. यामध्ये ३११ विद्यार्थ्यांची निवड झाली. एकूण तीन फेऱ्या मिळून ६५६ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली. सदर विद्यार्थी शाळांमध्ये आता प्रवेश घेणार आहेत. आणखी २५० वर जागा रिक्त राहणार आहेत. अनेक पालकांचा कल सीबीएससी माध्यमांच्या शाळांकडे आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांना स्टेट बोर्डची शाळा मिळाली आहे. त्यामुळे असे विद्यार्थी सदर शाळेत प्रवेश घेतील, याची फारशी शक्यता नाही. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाच्या जागा रिक्त राहणार आहेत.