३२ मुख्याध्यापक कारवाईच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 11:29 PM2019-06-23T23:29:04+5:302019-06-23T23:32:28+5:30

महाराष्ट्रात ३ ते ५ आॅक्टोबर २०११ या कालावधीत शाळांमध्ये विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान कमी पटसंख्या आढळलेल्या संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमी पटसंख्या आढळलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल ३२ शाळांचे मुख्याध्यापक कारवाईच्या रडारवर असल्याचे दिसून येत आहे.

32 Head Master's on the radar | ३२ मुख्याध्यापक कारवाईच्या रडारवर

३२ मुख्याध्यापक कारवाईच्या रडारवर

Next
ठळक मुद्देआज सुनावणी : विशेष पटपडताळणीत विद्यार्थी आढळले कमी

दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्रात ३ ते ५ आॅक्टोबर २०११ या कालावधीत शाळांमध्ये विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान कमी पटसंख्या आढळलेल्या संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमी पटसंख्या आढळलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल ३२ शाळांचे मुख्याध्यापक कारवाईच्या रडारवर असल्याचे दिसून येत आहे.
२०११ पर्यंत जिल्हा परिषदेसह खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पटावरील विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड राहत होती. मात्र प्रत्यक्ष तेवढ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वर्गात राहत नव्हती. शिवाय विविध शैक्षणिक योजनेचा लाभ बऱ्याच विद्यार्थ्यांना दिला जात होता. त्यामुळे राज्य शासनाने २०११ मध्ये सर्व शाळांमध्ये विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. ३ ते ५ आॅक्टोबर २०११ रोजी गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात शाळांची पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील दोन खासगी व जिल्हा परिषदेच्या २९ अशा एकूण ३२ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आढळली. दाखल विद्यार्थ्यांची संख्या अधिक असतानाही तेवढे विद्यार्थी शाळेत हजर का राहत नाही, याचे उत्तर शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाने त्यावेळी विशेष पटपडताळणी मोहीम राबविली.
२०११ मध्ये झालेल्या पटपडताळणीत आठ तालुक्यातील ३२ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आढळून आली होती. यामध्ये चामोर्शी तालुक्यातील दोन, मुलचेरा दोन, कोरची दोन, धानोरा एक, एटापल्ली पाच, भामरागड आठ, अहेरी नऊ व सिरोंचा तालुक्यातील तीन शाळांचा समावेश आहे. जिल्ह्यातील गहूबोडी, भेंडीकन्हार, सूरगाव, अडंगेपल्ली, मयालघाट, लेकुरबोडी, रेपीनगट्टा टोला, पुन्नूर, वेलमागड, पिंडीगुडम, रेंगावाही, वांगेतुरी, ब्राह्मणपल्ली, इरकडुम्मे, कोसपुंडी, कसनसूर खुर्द, हालेदंडी, दर्भा, पल्ली, गोरनूर, पेरकाभट्टी, तोडक, नैनेर, असा, कोत्तागुडम, तोंडेर, व्यंकटापूर, लंकाचेन, रायगुडम, मर्रीगुडम आदी जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे. याशिवाय आलापल्ली नजीकच्या पुन्नागुडम येथील खासगी प्राथमिक शाळा व सिरोंचा येथील एक खासगी शाळांचा समावेश आहे. पटपडताळणी मोहिमेदरम्यान कमी पटसंख्या आढळलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांवर कारवाई करावी, अशा मागणीची याचिका एका व्यक्तीने न्यायालयात दाखल केली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्याअनुषंगाने शाळांकडून आवश्यक माहिती मागविण्यात आली आहे.

-तर मुख्याध्यापक व शाळेवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा
२०११ च्या विशेष पटपडताळणीत जिल्ह्यातील ज्या ३२ शाळांची पटसंख्या कमी आढळून आली, अशा शाळांच्या त्यावेळी कार्यरत असलेल्या संबंधित मुख्याध्यापकांनी सन २०११-१२ पासून २०१८-१९ या कालावधीतील विद्यार्थी पटसंख्या, शासनाच्या विविध योजनांचा विद्यार्थ्यांना दिलेला लाभ आदी माहितीसह २४ जून २०१९ रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी जि.प. गडचिरोली या कार्यालात उपस्थित राहून आपला अभिप्राय सादर करावा, असे निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे यांनी आठ पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. जे मुख्याध्यापक या सुनावणीस उपस्थित राहणार नाहीत, त्या शाळा व मुख्याध्यापकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांनी २१ जूनच्या पत्रान्वये दिला आहे. हे पत्र बीओंना पोहोचले आहे.

सर्वाधिक शाळा अहेरी व भामरागडातील
३ ते ५ आॅक्टोबर २०११ दरम्यान झालेल्या शाळांच्या विशेष पटपडताळणी मोहिमेत गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक अहेरी तालुक्यातील नऊ व भामरागड तालुक्यातील आठ शाळांची विद्यार्थी उपस्थिती कमी आढळून आली. विद्यार्थी पटसंख्या कमी आढळून आलेल्या व आॅक्टोबर २०११ दरम्यान संबंधित शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्यांना सन २०११ ते २०१८-१९ पर्यंतची शाळेची सर्व शैक्षणिक माहिती घेऊन जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागात सोमवारी हजेरी लावावी लागणार आहे. त्यामुळे त्यावेळच्या संबंधित ३२ शाळांच्या मुख्याध्यापकांचे टेन्शन वाढले आहे.

Web Title: 32 Head Master's on the radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.