मेळाव्यात ३२ मुस्लीम जोडपी विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 09:53 PM2018-12-26T21:53:08+5:302018-12-26T21:53:31+5:30
तमाम मुस्लीम जमाअत देसाईगंजच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा २६ डिसेंबर रोजी बुधवारला स्थानिक कमलानगर स्थित मदिना मस्जिदच्या प्रशस्त आवारात सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात मुस्लीम समाजातील ३२ जोडप्यांचा रितीरिवाजाप्रमाणे विवाह लावून देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : तमाम मुस्लीम जमाअत देसाईगंजच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा २६ डिसेंबर रोजी बुधवारला स्थानिक कमलानगर स्थित मदिना मस्जिदच्या प्रशस्त आवारात सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात मुस्लीम समाजातील ३२ जोडप्यांचा रितीरिवाजाप्रमाणे विवाह लावून देण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ.कृष्णा गजबे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, किसन नागदेवे, बशीर पटेल, सामाजिक कार्यकर्ते संतोष श्याम दासानी, नरेश विठ्ठलानी, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, आरिफ खानानी, नगरसेवक हरीष मोटवानी, लच्चू रामानी, माजी नगराध्यक्ष डॉ.महेश पापडकर, ईश्वर कुमरे, मदिना मस्जिदचे इमाम कपील अहेमद नुरी, ख्वाजा गरीब नवाब मस्जिदचे इमाम कारी, गुलाम अहेमद यासिनी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ.कृष्णा गजबे म्हणाले, प्रतिष्ठेसाठी आयोजित करण्यात येणारे विवाह सोहळे अकारण खर्चास निमंत्रण आहे. विवाह सोहळ्याच्या माध्यमातून अनेक कुटुंब कर्जबाजारी होतात. या सर्व समस्येवर मात करण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन हाच स्तुत्य उपक्रम आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत आपले नैतिक कर्तव्य समजून एकात्मतेच्या भावनेने समाजबांधवांनी सहकार्य केल्यास अशा प्रकारच्या विवाह सोहळ्याचे आयोजन यशस्वीरित्या होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य कुटुंबियांना मुला, मुलींचे लग्न पैसेअभावी कसे पार पाडायचे, असा प्रश्न अनेकदा निर्माण होतो. आर्थिक स्थिती बेताची असलेल्या कुटुंबांसाठी सामूहिक विवाह सोहळे फायदेशिर ठरतात, असे आ.गजबे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खलील खान, मोहम्मद खान, युनुस खानानी, आरिफ पटेल, मीर उमेद, गुफरान कुरैशी, हाजी अहमद कादर कुरैशी, आमीर शेख, अहमद सलाम, मकसुद खान पठाण, आबीद अली, एम.के.मज्जीद, मिसार अहमद, नवेद पठाण यांच्यासह तमाम मुस्लीम जमाअतच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. सदर विवाह सोहळ्याला उपवर-वधूचे नातेवाईक उपस्थित होते.
आठ वर्षात २०३ मुस्लीम जोडपी विवाहबद्ध
देसाईगंज येथे बुधवारी झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात लगतच्या नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण २६ तालुक्यातील ३२ जोडपी रितीरिवाजाप्रमाणे विवाहबद्ध झाली. मुस्लीम समाजाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा आयोजन करण्याचे हे सलग आठवे वर्ष आहे. या आठ वर्षांत मुस्लीम समाजातील २०३ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांना मुस्लीम समाजाच्या वतीने संसारोपयोगी भेट साहित्य वितरित करण्यात आले. दरवर्षी विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांना साहित्य प्रदान केले जाते.