पुढील निवडणुकांसाठी मिळणार ३२०० ‘व्हीव्हीपॅट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:10 PM2018-07-18T23:10:20+5:302018-07-18T23:10:52+5:30
देशभरात गेल्या काही वर्षात झालेल्या निवडणुकांमधील निकालानंतर मतदान यंत्रांवर (ईव्हीएम) घेतल्या जात असलेली शंका आणि त्याला होत असलेला विरोध पाहता २०१९ मधील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान यंत्रासोबत व्हीव्हीपॅट हे उपकरण लागणार आहे. जिल्ह्यातील जुन्या सर्व ईव्हीएम बदलून नवीन ३२०० व्हीव्हीपॅट येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : देशभरात गेल्या काही वर्षात झालेल्या निवडणुकांमधील निकालानंतर मतदान यंत्रांवर (ईव्हीएम) घेतल्या जात असलेली शंका आणि त्याला होत असलेला विरोध पाहता २०१९ मधील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान यंत्रासोबत व्हीव्हीपॅट हे उपकरण लागणार आहे. जिल्ह्यातील जुन्या सर्व ईव्हीएम बदलून नवीन ३२०० व्हीव्हीपॅट येणार आहेत.
सन २००० पासून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान घेतले जात आहे. ही मतदान यंत्रे हैदराबाद येथील कंपनीने पुरविली होती. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांच्या एकतर्फी निकालानंतर या यंत्रांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. नुकत्याच झालेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत तर शेकडो ईव्हीएममध्ये बिघाड झाला. याचा फटका मतदानाच्या टक्केवारीला बसला. त्यामुळे आता ईव्हीएमला व्हीव्हीपॅट (वोट व्हेरीफाईड पेपर आॅडीट ट्रेल) हे यंत्र जोडले जाणार आहे. हे यंत्र बंगलोर येथील बेल कंपनीकडून पुरविले जाणार आहे.
७ सेकंदपर्यंत दिसणार दिलेले मत
व्हीव्हीपॅट लागल्यानंतर मतदाराने कोणाला मत दिले हे यंत्राच्या स्क्रीनवर ७ सेकंदपर्यंत पाहता येईल. त्यामुळे आपण ज्या नावासमोरील बटन दाबले त्यालाच मत गेल्याची खात्री मतदाराला करता येईल. याशिवाय त्या मताची मुद्रित स्लिप व्हीव्हीपॅटमध्येच जमा राहील. मतमोजणीच्या वेळी कोणी आक्षेप घेतल्यास त्या मुद्रित स्लिपवरून मतमोजणीची पडताळणी होऊ शकेल.