पावसाळ्यात मार्ग रोखणाऱ्या ३३ पुलांची उभारणी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 05:00 AM2020-06-04T05:00:00+5:302020-06-04T05:01:00+5:30
वर्गखोल्या व शाळांची दुरूस्ती, नगर पंचायत क्षेत्रातील जि.प.शाळांची दुरूस्ती, नवीन अंगणवाड्यांचे बांधकाम, रस्त्यांची कामे तसेच जिल्हा परिषद फंडातून वर्ग ५ ते ८ च्या मुलांसाठी गडचिरोलीत वसतिगृहाची उभारणी असे ३२ ठराव मंजूर करण्यात आले. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जि.प.ला नियतव्यय मिळाले नाही. त्यामुळे नियोजन पूर्ण होऊ शकले नाही. ४ मे २०२० च्या जीआरनुसार ३३ टक्के निधीत कपात होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच बुधवारी (दि.३) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने सर्वसाधारण सभा घेऊन ३२ ठराव मंजूर करण्यात आले. त्यात प्रामुख्याने पावसाळी संपर्क तुटणाऱ्या गावांना जोडणाºया ३३ छोट्या पुलांच्या उभारणीला मंजुरी देण्यासोबत २४ पूलवजा बंधारे बांधण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या पहिल्या माळ्यावरील व्हिडीओ कॉन्फरन्सिंग हॉलमध्ये जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, बांधकाम सभापती युधीष्ठिर बिश्वास, कृषी सभापती प्रा.रमेश बारसागडे, महिला व बालकल्याण सभापती रश्मी पारधी, समाजकल्याण रंजिता कोडापे, जि.प.सदस्य अॅड.राम मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
दुपारी १.३० च्या सुमारास सुरू झालेली ही सभा सायंकाळी ५.३० पर्यंत चालली.
यावेळी वर्गखोल्या व शाळांची दुरूस्ती, नगर पंचायत क्षेत्रातील जि.प.शाळांची दुरूस्ती, नवीन अंगणवाड्यांचे बांधकाम, रस्त्यांची कामे तसेच जिल्हा परिषद फंडातून वर्ग ५ ते ८ च्या मुलांसाठी गडचिरोलीत वसतिगृहाची उभारणी असे ३२ ठराव मंजूर करण्यात आले.
लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जि.प.ला नियतव्यय मिळाले नाही. त्यामुळे नियोजन पूर्ण होऊ शकले नाही. ४ मे २०२० च्या जीआरनुसार ३३ टक्के निधीत कपात होणार आहे. तरीही प्राप्त होणाऱ्या निधीनुसार या ठरावांची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सांगितले. प्रथमच अशा पद्धतीने सभा झाल्याने ती चर्चेचा विषय झाली.
१२ पंचायत समित्यांमधून लाईव्ह संवाद
या व्हिडीओ कॉन्फरन्स्ािंग सर्वसाधारण सभेत सहभागी होण्यासाठी सर्व १२ पंचायत समित्यांमध्ये सभापती आणि त्या-त्या क्षेत्राचे सदस्य जमले होते. अंतराच्या नियमाचे पालन करत आपले म्हणने मांडून त्यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी जि.प.मधील सर्व विभाग प्रमुख व्हिडीओ कॉन्फरन्सिंग हॉलच्या समोरील जिल्हा आरोग्य अधिकाºयांच्या कक्षात बसले होते. ज्यांच्याशी संबंधित विषय येईल त्या अधिकाºयांना पाचारण केले जात होते.
डीपीसीचा आढावाही प्रथमच जि.प.मध्ये
जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा परिषदेला मिळालेल्या निधीचा आढावा घेऊन पुढील मागण्यांवर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही जिल्हा परिषदेत हजेरी लावली. सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी त्यांनी अधिकाºयांसोबत बैठक घेतली. यावेळी चर्चा करताना पालकमंत्र्यांनी जेवढा निधी लागतो तेवढा मागा, पण मिळालेला निधी वेळेत खर्च करा, असे निर्देश अधिकाºयांना दिले. आपल्या मदत व पुनर्वसन विभागाकडून जिल्ह्यात १०० वॉटर एटीएम देणार असून त्यासाठी गावांची यादी देण्याची सूचना त्यांनी केली.