३३ प्रश्नांकडे लक्ष वेधून घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2016 02:08 AM2016-07-18T02:08:50+5:302016-07-18T02:08:50+5:30
सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनासाठी आपण २२ तारांकित व ११ लक्षवेधी सूचना असे एकूण ३३ प्रश्न पाठविले असून....
क्रिष्णा गजबे यांची माहिती : उद्योग, सिंचन,बोगस बियाणे विक्रीच्या मुद्यांवर भर
देसाईगंज : सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनासाठी आपण २२ तारांकित व ११ लक्षवेधी सूचना असे एकूण ३३ प्रश्न पाठविले असून आरमोरी विधानसभा क्षेत्रातील विविध ज्वलंत प्रश्नांवर विधानसभेचे लक्ष वेधून घेणार आहो, अशी माहिती आमदार क्रिष्णा गजबे यांनी देसाईगंज येथे त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी माहिती देताना गजबे म्हणाले, गडचिरोली जिल्हा हा राज्याच्या शेवटच्या टोकावरील मागासलेला जिल्हा आहे. जिल्हा विकासासंदर्भात अनेकदा मुंबई गाठावी लागते. यात बराच वेळ जातो. त्यामुळे विशेष बाब या सबबीखाली गडचिरोली जिल्हा विकास प्राधिकरण तयार करून उद्योग निर्मिती करावी तसेच रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावावे, अशी मागणी आपण विधानसभेत लावून धरणार आहोत, असे आमदार गजबे यांनी सांगितले.
कोरचीत जांभूळ प्रकल्प व्हावे, मालेवाडा पोलीस मदत केंद्राला पोलीस ठाण्याचा दर्जा देण्यात यावा, वडधा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करावी, नवीन लाडज या गावाची शासकीय अभिलेखात नोंद घेण्यात यावी, देसाईगंजात बसस्थानक उभारावे, देसाईगंजच्या दीक्षाभूमिचा विकास करण्यात यावा, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या निधीतील नियम व निकष शिथील करण्यात यावे, शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे नोंदविण्यात यावे, मामा तलावातील अतिक्रमण हटवून या तलावातील पाण्याची क्षमता वाढविण्यात यावी, कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना गोदाम उपलब्ध करून द्यावे आदी प्रश्नांचा तारांकित व लक्षवेधीमध्ये समावेश आहे, असेही आमदार गजबे यावेळी म्हणाले. यावेळी भाजपचे पदाधिकारी नाना नाकाडे हजर होते. (वार्ताहर)