दाेन महिन्यात ३३ हजार मनुष्यदिन राेजगार निर्मिती;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:27 AM2021-06-02T04:27:41+5:302021-06-02T04:27:41+5:30
महेंद्र रामटेके आरमोरी : कोरोनाच्या काळात घरीच बसून राहणाऱ्या व हाताला काम नसलेल्या मजुरांना प्रशासनाने रोहयोची ...
महेंद्र रामटेके
आरमोरी : कोरोनाच्या काळात घरीच बसून राहणाऱ्या व हाताला काम नसलेल्या मजुरांना प्रशासनाने रोहयोची कामे सुरू करून मोठा आधार दिला आहे. आरमोरी तालुक्यात रोजगार हमी योजनेचे काम ठिकठिकाणी सुरू करण्यात आले आहे. सोमवारी जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे आरमोरी तालुक्यात १६९ रोहयो कामावर ११७९३ मजुरांना रोजगार मिळाला आहे. तसेच चालू आर्थिक वर्षात एप्रिल व मे या दोन महिन्यांत ३३ हजार ३१७ मनुष्यदिन राेजगार निर्मिती झाली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट ओढवल्यानंतर लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे अनेकांच्या हाताला मिळणारे काम व रोजगार बुडाला. हातावर आणून पानावर खाणाऱ्या शेतकरी शेतमजुरांवर आर्थिक संकट ओढलेले होते. अशा आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या अनेक शेतमजूर कुटुंबांना रोहयोमुळे दिलासा मिळाला आहे. आरमोरी तालुक्यात प्रशासनाने जारी केलेल्या लाॅकडाऊनच्या नियमांचे पालन करून मास्कचा वापर, सॅनिटायझर, तापमान व ऑक्सिमीटर तपासणी इत्यादी सोयी-सुविधा कामाच्या ठिकाणी उपलब्ध करून देऊन व योग्य ती खबरदारी घेऊन आरमोरी तालुक्यात ग्रामपंचायत व यंत्रणा स्तरावरील कामे सुरू करण्यात आली.
दिनांक ३१ मे रोजी आरमोरी तालुक्यात ग्रामपंचायत व यंत्रणा स्तरावर १६९ कामे सुरू करून गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ११ हजार ७९३ मजुरांना रोजगार हमीच्या कामावर रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर मजगी, शेतबोडी, भातखाचार, मामा तलाव, नाला सरळीकरण, शोषखड्डे, घरकुल आदी १३५ अकुशल व वैयक्तिक स्वरूपाची कामे सुरू करण्यात आली असून १० हजार ३७५ मजुरांना रोजगार मिळाला आहे. तसेच यंत्रणा स्तरावर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत फळबाग लागवड व मजगी आदी प्रकारची २६ कामे सुरू करून त्यावर ९३९ मजुरांना काम देण्यात आले आहे. वन विभागाच्या मिश्र रोपवनाच्या ४ कामांवर २३ मजूर, जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागाच्या मामा तलाव व खोलीकरणाच्या ४ कामांवर ४५६ अशा ग्रामपंचायत व यंत्रणा स्तरावरील १६९ कामांवर ११ हजार ७९३ मजुरांना सोमवारी काम सुरू करून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. पावसाळा सुरू होईपर्यंत रोहयो कामे सुरू राहणार असून लाॅकडाऊनच्या काळात शासकीय नियमांचे काटेकोर पालन करून व योग्य खबरदारी घेऊन रोहयो कामे सुरू करण्यात आली आहेत.
बाॅक्स
तीन हजार कुटुंबांनी केली राेजगाराची मागणी
आरमोरी तालुक्यात ३ हजार ११ कुटुंबांनी कामाची मागणी केली होती. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात एप्रिल व मे २०२१ या दोन महिन्यात ६ हजार ५२ मजुरांना ग्रामपंचायत व यंत्रणा स्तरावर विविध प्रकारची अकुशल कामे उपलब्ध करून देण्यात आली. ३३ हजार ३१७ मनुष्यदिन राेजगार निर्मिती करण्यात आली.
===Photopath===
310521\5042img-20210531-wa0043.jpg
===Caption===
आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथील मामा तलावावर काम करताना मजूर