३३/११ केव्ही वीज उपकेंद्राचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 01:28 AM2018-09-27T01:28:31+5:302018-09-27T01:29:08+5:30

शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत सुभाषग्राम परिसरातील अडपल्ली माल येथे ४ कोटी ४६ लाख रूपये किमतीचे ३३/११ के व्ही विद्युत उपकेंद्राला मंजुरी देण्यात आली. एक वर्षाचा कालावधी उलटला असूनही या वीज उपकेंद्राचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे.

33/11 KV power sub-center work slow | ३३/११ केव्ही वीज उपकेंद्राचे काम संथगतीने

३३/११ केव्ही वीज उपकेंद्राचे काम संथगतीने

Next
ठळक मुद्देकाम मंजूर होऊन वर्ष लोटले : अडपल्ली माल येथील वास्तव उजेडात; कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : शासनाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत सुभाषग्राम परिसरातील अडपल्ली माल येथे ४ कोटी ४६ लाख रूपये किमतीचे ३३/११ के व्ही विद्युत उपकेंद्राला मंजुरी देण्यात आली. एक वर्षाचा कालावधी उलटला असूनही या वीज उपकेंद्राचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. परिणामी कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने सुभाषग्राम परिसरातील ५० पेक्षा अधिक गावातील नागरिक त्रस्त आहेत.
सुभाषग्राम परिसरात मागील अनेक वर्षांपासून महावितरणच्या वतीने कमी दाबाचा वीज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतातील वीज पंप बंद आहे. परिणामी शेती सिंचन व भाजीपाल्याची शेती करणे अडचणीचे ठरले आहे. शासकीय कार्यालयातील यंत्रणाही कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने बंद राहते. सुभाषग्राम ही मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. या बाजार पेठेत देवाणघेवाण करण्यासाठी ५० पेक्षा अधिक गावातील नागरिक व शेतकरी येत असतात. मात्र कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने व्यापाऱ्यांना त्रास होत आहे. अडपल्ली ग्रामपंचायतीच्या परिसरातील कमी दाब वीज पुरवठ्याची समस्या मार्गी लागावी, यासाठी शासनाने २०१७ मध्ये अडपल्ली माल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत ३३/११ केव्हीच्या विद्युत केंद्राचे काम मंजूर केले. हे काम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत मेसर्स विश्वनाथ प्रोजेक्ट लिमिटेडला देण्यात आले आहे. एक वर्षाच्या कालावधीत या वीज केंद्राचे काम पूर्ण करण्याचे कामाच्या वर्कआदेशात नमूद आहे. १० आॅक्टोबर २०१७ रोजी सदर खासगी कंपनीने वीज केंद्र उभारणीच्या कामास प्रारंभ केला. मात्र सद्य:स्थितीत हे काम २५ टक्के सुद्धा झाले नसल्याचे आढळून येत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांचे या कामाकडे दुर्लक्ष होत आहे.
कामाची गती वाढवा, अन्यथा आंदोलन
अडपल्ली माल येथील वीज उपकेंद्राच्या कामात गती वाढवावी, अन्यथा महावितरण व खासगी कंत्राटदाराच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अडपल्ली माल ग्रामपंचायतीचे उपसरपंच व्ही.जी.सागळे, कालीनगरचे सरपंच आकूल मंडल, अडपल्लीचे सरपंच बंडू मडावी, तंमुस अध्यक्ष हेमंत उराडे, सरपंच तपन सरकार, देवराव सिडाम, पं.स.उपसभापती आकुली बिश्वास, एकनाथ पाथर, सोनातन तरफदार, दीपक मडावी, मारोती मडावी, सुनील आलाम यांच्यासह अडपल्ली, तुमडी, सुभाषग्राम, आनंदग्राम, मलेझरी, वसंतपूर, कालीनगर, मलकापूर आदी गावातील नागरिकांनी दिला आहे. विहीत मुदतीत सदर वीज केंद्राचे काम पूर्ण न करणाऱ्या संबंधित कंपनीविरोधात कारवाई करावी, अशी मागणी पदाधिकारी व नागरिकांनी केली आहे.

अडपल्ली माल येथील वीज उपकेंद्राच्या कामाबाबत आमच्या काहीही माहिती नाही. मुख्य कार्यालयाकडे या कामाबाबतची माहिती आहे. आतापर्यंत जोतास्तरापर्यंत या वीज उपकेंद्राचे काम झाले आहे.
- संदीप मसादे, कनिष्ठ अभियंता, वीज उपकेंद्र आष्टी

Web Title: 33/11 KV power sub-center work slow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज