३४ हजार शौचालय होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2016 01:22 AM2016-06-29T01:22:59+5:302016-06-29T01:22:59+5:30
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सन २०१६-१७ या वर्षात बांधावयाच्या वैयक्तिक शौचालयाच्या जिल्हा परिषदेच्या वार्षिक
वार्षिक कृती आराखडा मंजूर : बांधकामाचे उद्दिष्ट दुपटीने वाढले; गोदरीमुक्तीवर जि. प. सीईओंचा भर
दिलीप दहेलकर गडचिरोली
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सन २०१६-१७ या वर्षात बांधावयाच्या वैयक्तिक शौचालयाच्या जिल्हा परिषदेच्या वार्षिक कृती आराखड्याला राज्य शासनाने मंजुरी प्रदान केली आहे. या आराखड्यानुसार जिल्ह्यात १५८ ग्रामपंचायतीच्या गावांत एकूण ३४ हजार २४९ वैयक्तिक शौचालय होणार आहेत. विशेष म्हणजे शासनाने यंदा वैयक्तिक शौचालयाचे उद्दिष्ट दुपटीने वाढविले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छतेचा संदेश देऊन गाव पातळीवर वैयक्तिक शौचालय उभारण्याचा जम्बो कार्यक्रम हाती घेतला. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत वैयक्तिक शौचालय उभारणीवर राज्य सरकारनेही कठोर पावले उचलली आहेत. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधणाऱ्या लाभार्थ्यांना शासनाकडून १२ हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. यामध्ये ६० टक्के रक्कम केंद्र व ४० टक्के रक्कम राज्य शासनाकडून मिळते. या कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात गतवर्षी सन २०१५-१६ मध्ये बाराही तालुक्यात एकूण ११ हजार ९४९ वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले.
देसाईगंज तालुक्याला वगळले
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत गतवर्षी सन २०१५-१६ मध्ये देसाईगंज तालुक्याला एकूण २ हजार ५२५ वैयक्तिक शौचालयाचे उद्दिष्ट देऊन तेवढेच शौचालय मंजूर करण्यात आले. मात्र यंदा सन २०१६-१७ वर्षात देसाईगंज तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीचा शौचालय बांधकामाच्या वार्षिक कृती आराखड्यात समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे यंदा या तालुक्यात वैयक्तिक शौचालयाचे काम होणार नाही.
एक कोटींचा निधी उपलब्ध
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सन २०१६-१७ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी लाभार्थ्यांना अनुदान देण्याकरिता गडचिरोली जिल्हा परिषदेला १ कोटींचा निधी शासनाकडून उपलब्ध झाला आहे. या निधीतून राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने मंजूर केलेल्या वार्षिक कृती आराखड्यातील उद्दिष्टानुसार १५८ ग्रामपंचायतीत एकूण ३४ हजार २४९ वैयक्तिक शौचालय उभारण्यात येणार आहे.
बांधकाम न करणाऱ्या ग्रामसेवकावर होणार कारवाई
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासंदर्भात अलिकडेच अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कृती आराखड्यातील उद्दिष्टानुसार मंजूर शौचालयाचे बांधकाम न करणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांवर कठोर कारवाई करणार, असा इशारा त्यांनी बैठकीत दिला. नुकताच त्यांनी शौचालय बांधकामासंदर्भात सिरोंचा, अहेरी, धानोरा तालुक्याच्या ग्रामीण भागात दौरा केला.
९० शौचालयाचे काम सुरू
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत १५८ ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या वैयक्तिक शौचालयाच्या वार्षिक कृती आराखड्याला शासनाने मे महिन्यात मंजुरी प्रदान केली. सद्य:स्थितीत गाव पातळीवर ९० शौचालयाचे काम सुरू असल्याची माहिती जि. प. च्या सूत्रांकडून मिळाली आहे. धान पिकाची रोवणी आटोपल्यानंतर शौचालयाच्या बांधकामाला जिल्ह्यात गती मिळणार आहे.