चार वर्षात वज्राघाताने ३५ नागरिकांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 11:45 PM2019-06-23T23:45:45+5:302019-06-23T23:46:38+5:30

गडचिरोली जिल्ह्यात जंगल असल्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत विजा पडण्याचे प्रमाण अधिक आहे. २०१३ ते २०१७ या कालावधीत वीज पडून सुमारे ३५ नागरिक व शेकडो पाळीव जनावरांचा मृत्यू झाला आहे.

35 people killed during the four years of intimidation | चार वर्षात वज्राघाताने ३५ नागरिकांचा बळी

चार वर्षात वज्राघाताने ३५ नागरिकांचा बळी

Next
ठळक मुद्देजनावरांचाही मृत्यू : वीज पडण्याचे प्रमाण तुलनेने अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात जंगल असल्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत विजा पडण्याचे प्रमाण अधिक आहे. २०१३ ते २०१७ या कालावधीत वीज पडून सुमारे ३५ नागरिक व शेकडो पाळीव जनावरांचा मृत्यू झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात धानाची शेती केली जाते. ऐन पावसाळ्यात धान रोवणीची कामे केली जातात. धो-धो पाऊस पडत असला तरी रोवणी सुरू होते. त्यामुळे शेतकरी वर्ग पावसाळ्याच्या दिवसात शेतात राहतात. परिणामी वीज पडून मृत्यूमुखी पडण्याच्या घटना घडतात. बहुतांश गावे जंगलाने व्यापली आहेत. वीज झाडाकडे आकर्षित होते. त्यामुळेही जीवितहानी होते. मेघगर्जना होत असल्यास कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत नागरिकांमध्ये पाहिजे, त्या प्रमाणात जागृती नाही. त्यामुळेही जीव गमवावा लागतो. २०१३ ते २०१७ या चार वर्षांच्या कालावधीत जिल्हाभरातील ३५ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. मानवाबरोबरच पाळीव प्राण सुध्दा विजांचे शिकार बनतात. मागील चार वर्षात शेकडो जनावरांना जीव गमवावा लागला आहे.
विजेपासून संरक्षण करण्यासाठी वीज रोधक यंत्र लावला जातो. मात्र या यंत्राची विजेला अटकाव करण्याची क्षमता फार कमी राहते. वीजरोधक यंत्रापासून ५० ते ६० मीटर अंतरावर वीज पडणार असेल तर तेवढ्या अंतरावरील वीज स्वत:कडे खेचून वीजरोधक यंत्र वीज पडण्यापासून होणारी हानी थांबवू शकते. वीजरोधक यंत्राची ही मर्यादा आहे. विजेपासून संरक्षण करायचे असल्यास मेघगर्जना होत असताना शक्य तो घराबाहेर न पडणे हाच एकमेव उपाय आहे.
विजा चमकत असताना शक्यतो लहान टेकडी, एकाकी झाड, झेंड्याचा खांब, प्रक्षेपण मनोरा यासारख्या उंच असलेल्या जागांचा आश्रय टाळावा. विजेपासून संरक्षण मिळण्यासाठी कोणतीही जागा पूर्ण सुरक्षित नसते. तरीही बंदीस्त इमारत, चारचाकी वाहन, ट्रक, बस, कार ही साधने बरीच सुरक्षित मानली जातात व आसरा घेण्यास काहीच हरकत नाही. वादळादरम्यान जनावरे झाडाखाली एकत्र गोळा होतात आणि विजेच्या कोसळण्याने एकाचवेळी अनेक जनावरांना प्राण गमवावा लागतो. वीज नेहमी सर्वात उंच जागेवर कोसळते. धातूची वस्तू जेवढी मोठी तेवढी वीज कोसळण्याची शक्यता जास्त असते. जेवढे झाड उंच तेवढा धोका अधिक असतो, त्यामुळे झाडापासून दूर राहावे.
जर तुमच्या आसपास एखाद्या व्यक्तीवर वीज पडली असेल तर त्याच्यावर त्वरित प्रथमोपचार करा. श्वासोच्छवास थांबला असेल तर त्या व्यक्तीच्या तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. त्यामुळे त्या व्यक्तीचा श्वासोच्छवास नैसर्गिकरित्या सुरू होण्यास मदत होईल.
हृदयाचे ठोके थांबले असल्यास सीपीआरचा उपयोग करावा. नाडीचा ठोका चालू असेल तर अंगावर भाजल्याच्या खुणा, हाडांच्या इजा याबाबत तपासणी व नोंद करा. दृष्टी ठिक आहे किंवा नाही, ऐकू येते किंवा नाही तसेच इतर हालचालींची नोंद घ्या.
नागरिकांमध्ये जनजागृतीचा प्रयत्न
आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत विजेपासून बचाव करण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत नागरिकांमध्ये विविध माध्यमातून जनजागृती केली जात आहे. त्यामुळे विजा पडून मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. २०१८ मध्ये वीज पडून एकाही नागरिकाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. मेघगर्जना होत असताना शक्यतो जवळपासच्या इमारतीचा आसरा घेणे हा सर्वाधिक चांगला उपाय आहे. मेघगर्जना सुरू असताना शक्यतो घराबाहेर पडू नये, असा सल्ला आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.

Web Title: 35 people killed during the four years of intimidation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस