३५ हजार वीज ग्राहक झाले डिजिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:30 AM2018-12-08T00:30:02+5:302018-12-08T00:31:11+5:30
आॅनलाईन पध्दतीने वीज बिलाचा भरणा करण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. आॅनलाईन बिल भरण्याच्या सुविधेमुळे रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचत असल्याने दिवसेंदिवस आॅनलाईन वीज बिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.
दिगांबर जवादे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आॅनलाईन पध्दतीने वीज बिलाचा भरणा करण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. आॅनलाईन बिल भरण्याच्या सुविधेमुळे रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचत असल्याने दिवसेंदिवस आॅनलाईन वीज बिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. गडचिरोली सर्कलमधील सुमारे ३५ हजार ३७२ वीज ग्राहकांनी ३ कोटी २५ लाख ७१ हजार ११६ रुपयांचे वीज बिल आॅनलाईन पध्दतीने भरले आहे.
उत्पन्नाच्या तुलनेत महावितरणचा खर्च अधिक होत असल्याने दिवसेंदिवस महावितरण आर्थिक अडचणीत येत आहे. खर्चात कपात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांनाही त्याची सवय लावण्याच्या दृष्टीने महावितरण प्रयत्न करीत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्ट फोन आले आहेत. त्यामुळे ग्राहकांनाही आॅनलाईन पध्दतीने वीज बिलाचा भरणा करणे शक्य होत असल्याने महावितरणची आॅनलाईन वीज बिल भरण्याची योजना ग्राहकांच्या सुध्दा पसंतीस पडत आहे.
बऱ्याचवेळा छापील स्वरूपातील वीज बिल मिळण्यास विलंब होतो. वीज बिल भरण्याचा दिनांक निघून गेल्यानंतर वीज बिल मिळाल्याच्या तक्रारी ग्राहकाकडून नेहमी येतात. बºयाचवेळा वीज बिल उशीरा भरल्याने तो दुसऱ्या महिन्यात लागून येतो. त्यामुळे पुन्हा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन जुन्या महिन्यातील वीज बिल कपात करावा लागतो. या सर्व भानगडीमध्ये वीज ग्राहकाला त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महावितरणने मागील एक वर्षापासून एसएमएसची सुविधा उपलब्ध करून दिले आहे. या सुविधेमध्ये संबंधित ग्राहकाच्या मोबाईलवर वीज बिल भरण्याबाबत एसएमएस पाठविला जातो. त्यामुळे ग्राहकाला वीज बिल भरण्यास पुरेसा कालावधी उपलब्ध होते. यामुळे वीज बिल भरण्याची टक्केवारीही वाढली आहे.
गो-ग्रीनचा पर्याय निवडणाऱ्यांना सवलत
ग्राहकांना आॅनलाईन वीज बिल भरण्यास प्रोत्साहित करण्याकरिता महावितरणने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या धोरणाला अधिक प्रोत्साहित करण्यासाठी जे वीज ग्राहक छापील बिलाऐवजी ई-मेल, एसएमएसचा पर्याय स्वीकारतील, अशा ग्राहकांना १ डिसेंबरपासून प्रती बील १० रूपये सवलत दिली जाणार आहे. याला गो-ग्रीन योजना असे नाव देण्यात आले आहे.
गो-ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीज बिलावर गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेत स्थळावर करावी. गो-ग्रीनचा पर्याय निवडल्यास वीज बिलावरील सवलतीसह वीज बिल ग्राहकांना तातडीने उपलब्ध होणार आहे. या बिलाचे जतन करणेही सोपे राहणार आहे. यामध्ये कागदाचा वापर थांबणार असल्याने पर्यायाने पर्यावरणपुरक सदर बिल राहत असल्याने या सुविधेला गो-ग्रीन सुविधा असे नाव महावितरणने दिले आहे. याबाबत जनजागृती केली जात आहे.