३५ हजार क्विंटल बियाण्यांचा पुरवठा
By admin | Published: June 22, 2017 01:33 AM2017-06-22T01:33:08+5:302017-06-22T01:33:08+5:30
पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना बियाणांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभागाने उन्हाळ्यातच नियोजन केले होते.
कृषी केंद्र चालकांकडे पुरेसा साठा : ख्ररेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना बियाणांचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभागाने उन्हाळ्यातच नियोजन केले होते. त्यामुळे पेरणीच्या पूर्वीच जवळपास ३५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहेत. कृषी विभागाने ३४ हजार ५६५ क्विंटल बियाणांचे नियोजन केले होते. त्यापेक्षा अधिक बियाणांचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही दुकानदाराला अधिकची किमत बियाणांसाठी मोजू नये असे आवाहन कृषी विभागाच्या मार्फत करण्यात आले आहे.
खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाते. यातील धान हे प्रमुख पीक आहे. सुमारे एक लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड होते. त्यामुळे सर्वाधिक बियाणे धान पिकाचे लागते. या बियाणांचा तुटवडा निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना अधिकची किम्मत देऊन बियाणे खरेदी करावे लागते. त्याचबरोबर बियाणांचा काळाबाजार फोफावण्याची शक्यता राहते. बियाणांचा काळाबाजार थांबून शेतकऱ्यांची लूट थांबण्यासाठी कृषी विभागाच्या मार्फत नियोजन केले होते. पेरणीपूर्वीच बियाणे कृषी केंद्रांमध्ये दाखल होतील यादृष्टीने पाठपुरावा केला. त्यामुळे पेरणीपूर्वी मागणीपेक्षा अधिक बियाणे उपलब्ध झाले आहेत.
जिल्ह्याच्या काही भागात पुरेसा पाऊस झाल्याने पेरण्यांना वेग आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रांमध्ये गर्दी करण्यास सुरूवात केली आहे. बियाणांचा सार्वजनिक कंपन्या व खासगी कंपन्या यांच्या मार्फत बियाणांचा पुरवठा केला जातो. कृषी विभागाने केलेल्या नियोजनाच्या अधिक प्रमाणात बियाणांचा पुरवठा झाला आहे. मात्र काही ठिकाणची माहिती कृषी विभागाला प्राप्त झालेली नाही. कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार कृषी विभागाने ३४ हजार ५६५ क्विंटल बियाणांचे नियोजन केले होते. त्यापैकी २३ हजार ४२९ क्विंटल बियाणे उपलब्ध झाल्याची आकडेवारी प्राप्त झाली आहे. प्रत्यक्षात मात्र यापेक्षा अधिक प्रमाणात पुरवठा झाला असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.
कृषी विभागाने धान पिकाच्या बियाणांचा ३१ हजार ८३७ क्विंटल बियाणांचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने नियोजन केले होते. त्याबरोबर सोयाबीन २ हजार १०० क्विंटल, तूर ३५० क्विंटल, कापूस १३९ क्विंटल, मका १२५ क्विंटल, उडीद ३ क्विंटल, तीळ ११ क्विंटल बियाणांचा पुरवठा होण्याच्या दृष्टिने नियोजन केले होते. मात्र यापेक्षाही अधिक प्रमाणात कृषी केंद्र चालकांकडे बियाणे उपलब्ध झाले आहेत. कृषी केंद्र व कृषी कार्यालयांमध्ये धान बियाणांसाठी शेतकऱ्यांची गर्दी असल्याचे दिसून येत आहे. सध्या धान पेरणीलाही वेग आलेला आहे.
खासगी कंपन्यांमध्ये लागली स्पर्धा
पाच वर्षांपुर्वी बियाणांचा पुरवठा करणाऱ्या काही निवडकच कंपन्या होत्या. त्यामुळे या कंपन्यांची मनमानी चालत होती. त्यांच्याच हातात पुरवठ्याचे सुत्र असल्याने पुरवठा नियंत्रित करून भाववाढ करीत होते. बियाणे उपलब्ध होणार नाही अशी भिती शेतकऱ्यांमध्ये असल्याने दुकानदार सांगेल तेवढी किम्मत शेतकरी मोजण्यास तयार होत होता. यामध्ये शेतकऱ्यांची मोठी लूट होत होती. कंपन्यांचे बियाणे परवडत नसल्याने शेतकरी स्वत:कडचेच बियाणे वापरत होते. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. बियाणे विक्रीच्या क्षेत्रात अनेक कंपन्यांनी उडी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्येच स्पर्धा निर्माण झाली आहे. स्पर्धेमुळे बियाणांचा पुरवठा वाढला आहे. त्याचबरोबर वाजवी किमतीत बियाणेसुद्धा उपलब्ध झाली आहेत. बियाणांचा होणारा काळाबाजार आता काही प्रमाणात थांबला आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही दुकानदाराला अधिकची किम्मत देऊ नये. अधिकची किंमत मागीतल्यास याबाबतची तक्रार कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे करावी असे आवाहन करण्यात आले आहे.