४८४५ धान उत्पादकांचे ३६ कोटींचे चुकारे थकीत; रब्बी हंगामात ३.२२ लाख क्विंटल खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 08:45 PM2021-08-03T20:45:27+5:302021-08-03T20:45:27+5:30
धान उत्पादकांचा जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान खरेदीची मुदत ३१ जुलैला संपली. या वर्षी ३ लाख २२ हजार क्विंटल धानाची खरेदी आदिवासी विकास महामंडळाने केली.
गडचिरोली : धान उत्पादकांचा जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान खरेदीची मुदत ३१ जुलैला संपली. या वर्षी ३ लाख २२ हजार क्विंटल धानाची खरेदी आदिवासी विकास महामंडळाने केली. त्यातील काही शेतकऱ्यांचे चुकारे झाले आहेत. पण आता निधीच संपल्याने ४८४५ शेतकऱ्यांचे ३६ कोटी रुपयांचे चुकारे थकीत आहेत. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असताना त्यांचे हक्काचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली आणि अहेरी उपप्रादेशिक कार्यालयामार्फत आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत शासनाच्या हमीभावानुसार शेतकऱ्यांकडील धान खरेदी केला जातो.
जिल्ह्यात हळूहळू सिंचनाच्या सुविधा वाढत असल्याने रब्बी हंगामातील धानाची लागवडही वाढत आहे. गेल्या रब्बी हंगामात ८२२१ शेतकऱ्यांनी ३ लाख २२ हजार ९८५ क्विंटल धान आदिवासी विकास महामंडळाला विकला. त्याची किंमत ६० कोटी ३३ लाख होती. त्यापैकी ३३७६ शेतकऱ्यांना २४ कोटी २९ लाखांचे चुकारे मिळाले. पण उर्वरित ४८४५ शेतकरी बाकी आहेत. निधी उपलब्ध झाल्यानंतरच ते चुकारे अदा केले जातील, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.