३७ टक्के विद्यार्थी गणित व भाषेत कच्चे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 01:24 AM2018-03-22T01:24:13+5:302018-03-22T01:24:13+5:30
शालेय शिक्षण विभागाच्या वतीने जानेवारी महिन्यात पहिली व फेब्रुवारी दुसरी अध्ययन स्तर निश्चिती चाचणी घेण्यात आली.
दिगांबर जवादे।
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : शालेय शिक्षण विभागाच्या वतीने जानेवारी महिन्यात पहिली व फेब्रुवारी दुसरी अध्ययन स्तर निश्चिती चाचणी घेण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या पहिली ते आठवीच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ३८ टक्के विद्यार्थी भाषा विषयात तर ३७ टक्के विद्यार्थी गणित विषयात कच्चे असल्याचे दिसून आले आहे. या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देऊन त्याचा अध्ययन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसीत करण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यभरात अनेक उपक्रम राबविले जात आहेत. तरीही काही विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता अत्यंत कमी असल्याचे दिसून आले. विद्यार्थी ज्या वर्गात शिकत आहे. त्या वर्गातील मुलभूत ज्ञान विद्यार्थ्याला माहित नसेल तर त्याच्या पुढील बाबी समजण्यास अडचणी निर्माण होतात. नेमक्या किती विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गानुसार मुलभूत ज्ञान आहे व किती विद्यार्थी मागे आहेत. याचा शोध घेण्यासाठी जिल्हा परिषदे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तर निश्चिती चाचण्या घेण्यात आल्या.
गडचिरोली जिल्ह्यात पहिली अध्ययन स्तर निश्चितीची फेरी १६ ते २५ जानेवारी या कालावधीत घेण्यात आली. एकूण ६१ हजार ४०१ विद्यार्थ्यांनी अध्ययन स्तर निश्चिती चाचणी दिली. भाषा विषयात ८० टक्के विद्यार्थ्यांना भाषण व संभाषण करता आले. ७५ टक्के विद्यार्थ्यांना शब्द वाचन करता आले. ६५ टक्के विद्यार्थ्यांना वाक्य वाचन तर ४९ टक्के विद्यार्थ्यांना समजपूर्वक उतारा वाचन करता आले. गणित विषयाच्या अध्ययन स्तर निश्चिती चाचणीत ७६ टक्के विद्यार्थ्यांना ० ते ९ या अंकांचे वाचन करता आले. ६९ टक्के विद्यार्थ्यांना संख्या ज्ञान असल्याचे निष्पन्न झाले. ६९ विद्यार्थ्यांना बेरीज व ६४ टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी, ५७ टक्के विद्यार्थ्यांना गुणाकार तर ५५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार करता आले.
ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत त्यांच्या वर्गानुसार अध्ययन क्षमता प्राप्त केली नसल्याचे लक्षात आले अशा विद्यार्थ्यांवर शिक्षकांनी विशेष लक्ष केंद्रीत करून अध्यापन केले. शैक्षणिक साधनांचा वापर करून त्यांना शिकविण्यात आले. त्यानंतर २० ते २८ फेब्रुवारीदरम्यान दुसरी अध्ययन स्तर निश्चिती फेरी घेण्यात आली. एकूण ६६ हजार ३०८ विद्यार्थ्यांपैकी ६५ हजार १९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये ९६ टक्के विद्यार्थ्यांना संभाषण कौशल्य, ९२ टक्के विद्यार्थ्यांना शब्द वाचन, ८१ टक्के विद्यार्थ्यांना वाक्य वाचता आले. तर ६२ टक्के विद्यार्थ्यांना समजपूर्वक उतारा वाचता आला.
गणिताच्या चाचणीदरम्यान ९५ टक्के विद्यार्थ्यांना शुन्य ते नऊ अंकाचे वाचन करता आले. ९१ टक्के विद्यार्थ्यांना संख्याज्ञान असल्याचे आढळून आले, ८९ टक्के विद्यार्थ्यांना बेरीज, ८१ टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी, ७३ टक्के विद्यार्थ्यांना गुणकार तर ६३ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार करता आला.
दुसऱ्यां चाचणीत स्थिती सुधारली
भाषा विषयात समाजपूर्वक उतारा वाचणे महत्त्वाचे मानले जाते. पहिल्या चाचणीत फक्त ४९ टक्के विद्यार्थ्यांना समाजपूर्वक उतारा वाचता येत होता. तर ५५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येत होता. जे विद्यार्थी मागे होते त्यांच्याकडे शिक्षकांनी विशेष लक्ष घातल्यानंतर दुसºया फेरीत विद्यार्थ्यांची प्रगती सुधारली. दुसºया फेरीमध्ये ६२ टक्के विद्यार्थ्यांना समजपूर्वक उतारा वाचता आला. तर ६३ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार करता आला आहे.
मुख्य सचिवांकडून कौतुक
अध्ययनस्तर निश्चिती कार्यक्रम गडचिरोली जिल्ह्यात अतिशय चांगल्या पध्दतीने राबविल्याबाबत १७ मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, डीआयईसीपीडीचे प्राचार्य डॉ. शरदचंद्र पाटील व शिक्षणाधिकारी गुढे यांचा राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांनी सत्कार केला.