आरमाेरी तालुक्यात ३९ हजार मतदारांनी बजाविला मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:37 AM2021-01-19T04:37:45+5:302021-01-19T04:37:45+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : आरमोरी तालुक्यात २७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी ८५ मतदान केंद्रांवर मतदान प्रकिया पार पडली. तालुक्यातील ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी तालुक्यात २७ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी ८५ मतदान केंद्रांवर मतदान प्रकिया पार पडली. तालुक्यातील मतदानाची टक्केवारी ८०.३४ एवढी आहे. ३८ हजार ८९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या वर्षी माेठ्या प्रमाणात मतदानाची टक्केवारी वाढली आहे.
आरमोरी तालुक्यातील एकूण ३२ ग्रामपंचायतींपैकी २७ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. २१४ जागांसाठी एकूण ४९९ उमेदवार निवडणुकीत उभे होते. संवेदनशील मतदान केंद्रांवर माेठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. संक्रांतीचा पाडवा असल्याने अनेक गावांत दारू पिऊन काही लोकांनी लहानसहान कारणांवरून भांडणे केल्याच्या घटना घडल्या. मात्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. एकूण ४८ हजार ४१७ मतदारांपैकी ३८ हजार ८९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १९ हजार ७८६ पुरुष तर १९ हजार ११३ महिला मतदारांचा समावेश आहे.
आरमोरी तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायतीची मतदानाची टक्केवारी सर्वात जास्त म्हणजे ९४.७५ टक्के एवढी आहे. येथील बूथ क्रमांक ९० वर ९६.१४ एवढी आहे तर सर्वात कमी मतदानाची टक्केवारी पळसगाव ग्रामपंचायतीची असून टक्केवारी ४०.४ एवढी आहे. पळसगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाथरगोटा येथील मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने या गावात सर्वात कमी मतदान झाले आहे.