१६१ सरपंचांना मिळणार चार हजार रुपये मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 10:16 PM2019-08-06T22:16:22+5:302019-08-06T22:17:01+5:30

राज्य शासनाने सर्व सरपंचांचे मानधन ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार तीन हजार, चार हजार व पाच हजार रुपये केले आहे. या संदर्भाचा शासन निर्णय ३० जुलै २०१९ रोजी निर्गमित करण्यात आला. या जीआरनुसार लोकसंख्येच्या आधारावर गडचिरोली जिल्ह्यातील २९२ सरपंचांना तीन हजार तर १६१ सरपंचांना महिन्याकाठी चार हजार रुपये मानधन मिळणार आहे.

4 Sarpanchs will get Rs | १६१ सरपंचांना मिळणार चार हजार रुपये मानधन

१६१ सरपंचांना मिळणार चार हजार रुपये मानधन

Next
ठळक मुद्देउपसरपंचांनाही लाभ : २९२ सरपंच तीन हजारांचे मानकरी

दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्य शासनाने सर्व सरपंचांचे मानधन ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार तीन हजार, चार हजार व पाच हजार रुपये केले आहे. या संदर्भाचा शासन निर्णय ३० जुलै २०१९ रोजी निर्गमित करण्यात आला. या जीआरनुसार लोकसंख्येच्या आधारावर गडचिरोली जिल्ह्यातील २९२ सरपंचांना तीन हजार तर १६१ सरपंचांना महिन्याकाठी चार हजार रुपये मानधन मिळणार आहे.
उपसरपंचांनासुध्दा ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार तीन हजार, चार हजार व पाच हजार रुपये मानधन महिन्याकाठी मिळणार आहे. पूर्वीपेक्षा आता सरपंचांच्या कर्तव्यात व कामांमध्ये वाढ झाली आहे. ग्रामपंचायतीचे अधिकार वाढविल्याने सरपंचांना ग्रामपंचायतीच्या कामासाठी बराच वेळ द्यावा लागतो. शिवाय वाढत्या महागाईत सरपंचांना आर्थिक अडचण जाणवते. सन २००९ नंतर ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या मानधनात वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे सरपंच संघटनेकडून सरपंचाच्या मानधनात वाढ करण्याची मागणी सातत्याने होत होती. लोकप्रतिनिधींकडेही ही मागणी रेटून धरण्यात आली होती. अखेर या मागणीचा विचार करून राज्याच्या ग्राम विकास विभागाने लोकसंख्येनुसार सरपंचाच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला.
जिल्ह्यात १२ पंचायती समिती असून सद्य:स्थितीत एकूण ४५५ ग्रामपंचायती आहेत. यापूर्वी जिल्ह्यात ४५६ ग्रामपंचायती होत्या. आरमोरी ही नगर परिषद झाली व या नगर परिषदेत अरसोडा ग्रामपंचायतीचा समावेश झाला. त्यामुळे आता ग्रामपंचायतीची संख्या ४५५ झाली आहे. जिल्ह्यात ० ते १ हजार लोकसंख्या असलेल्या ७६ ग्रामपंचायती आहेत. एक हजार ते दोन हजार लोकसंख्या असलेल्या २१६ ग्रामपंचायती आहेत. दोन हजार पर्यंत लोकसंख्या असलेल्या २९२ ग्रामपंचायतीच्या सरपंचांना महिन्याकाठी तीन हजार रुपये मानधन मिळणार आहे. २ हजार १ ते ३ हजार दरम्यान लोकसंख्या असलेल्या १०४ ग्रामपंचायती आहेत. ३ हजार १ ते ४ हजार दरम्यान लोकसंख्या असलेल्या ३५ ग्रामपंचायती, ४ हजार १ ते ५ हजार दरम्यान लोकसंख्या असलेल्या १३, ५ हजार १ ते ६ हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती सात आहेत. ६ हजार १ ते ७ हजार दरम्यान लोकसंख्या असलेल्या दोन, ८ हजार १ ते नऊ लोकसंख्या असलेली एक व १ हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेली एकच ग्रामपंचायत आहे. या सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचांना लोकसंख्येच्या आधारे जुलै महिन्यापासून वाढीव मानधन मिळणार आहे.
१७ ग्रामपंचायती अजुनही सरपंचाविना
अहेरी उपविभागात नक्षली दहशत तसेच इतर कारणांमुळे सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी कोणी नामांकनच दाखल केलेले नाही. परिणामी दुर्गम भागात अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त राहाते. अशा ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. जवळपास १० ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक आहेत. याशिवाय काही ग्रामपंचायतींमध्ये सरपंच अपात्र ठरल्याने उपसरपंचाकडे प्रभार देण्यात आला आहे. सध्या प्रशासन व उपसरपंचाकडे सरपंचपदाचा प्रभार असणाऱ्या १७ ग्रामपंचायती असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल.पुराम यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच भामरागड, सिरोंचा, अहेरी, कोरची, कुरखेडा आदी तालुक्यातील सरपंचपदाची पोटनिवडणूक घेण्यात आली. परंतू यावेळीही अनेक ठिकाणची पदे रिक्त राहिली.

काही ग्रामपंचायतींचा कारभार उपसरपंचाकडे
प्रशासनाच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून निवडणुका घेतल्या जातात. मात्र जिल्ह्यात ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांची पदे रिक्त राहत असल्याने दरवर्षी पोटनिवडणुका घ्याव्या लागतात. जिल्ह्यातील काही उपसरपंचाकडे सरपंचपदाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. मात्र अशा नेमक्या किती ग्रामपंचायती आहेत, याची माहिती जि.प. प्रशासनाकडे नाही. या संदर्भाची माहिती सर्व पंचायत समितीस्तरावरून मागविण्यात आली असल्याचे पंचायत विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title: 4 Sarpanchs will get Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.