४० पेट्या दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:48 AM2018-09-30T00:48:03+5:302018-09-30T00:50:25+5:30
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धानंद मांडवकर यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह देसाईगंज येथील रेल्वे मार्गाच्या बोगद्यात सापळा रचून ४० पेट्या देशी व विदेशी दारू गुरूवारी रात्रीच्या सुमारास जप्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धानंद मांडवकर यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह देसाईगंज येथील रेल्वे मार्गाच्या बोगद्यात सापळा रचून ४० पेट्या देशी व विदेशी दारू गुरूवारी रात्रीच्या सुमारास जप्त केली. या प्रकरणातील दोन आरोपींना तालुका सत्र न्यायालयाने १ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दोमेश्वर गुलाब दुमरे (२३) रा. कसारी तालुका देसाईगंज, रोशन हरीदास लोखंडे (२७) रा. सुरगाव ता. उमरेड जि. नागपूर, अशी आरोपींची नावे आहेत. लाखांदूरवरून देसाईगंज मार्गे गडचिरोली जिल्ह्यात वाहनाने दारू येत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरिक्षक मांडवकर यांना मिळाली.
त्यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह रेल्वे मार्गाच्या बोगदा परिसरात सापळा रचला. एमएच ३० एल ८३३७ क्रमांकाच्या वाहनाची झडती घेतली असता, तब्बल ४० पेट्या देशी व विदेशी दारू आढळून आली.
या प्रकरणातील दोनही दारू विक्रेत्या आरोपींवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांना देसाईगंजच्या न्यायालयात शनिवारी हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना १ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर कारवाई पोलीस हवालदार ठाणेदार मांडवकर, पोलीस हवालदार लांजेवार व इतर सहकारी कर्मचाऱ्यांनी केली.