बेरोजगारांसाठी ४१ दुकान गाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 11:49 PM2019-02-26T23:49:31+5:302019-02-26T23:50:06+5:30

एटापल्ली पंचायत समितीने अभिनव उपक्रम राबवित कार्यालय परिसरात सुमारे ४१ दुकानांचे गाळे बांधण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. या गाळ्यांच्या माध्यमातून पंचायत समितीला उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. तसेच बेरोजगार युवकांनाही दुकान टाकण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे.

41 shop chairs for unemployed | बेरोजगारांसाठी ४१ दुकान गाळे

बेरोजगारांसाठी ४१ दुकान गाळे

googlenewsNext
ठळक मुद्देस्वतंत्र बाजारपेठ होणार तयार : एटापल्ली पंचायत समितीचा अभिनव उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्ली पंचायत समितीने अभिनव उपक्रम राबवित कार्यालय परिसरात सुमारे ४१ दुकानांचे गाळे बांधण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. या गाळ्यांच्या माध्यमातून पंचायत समितीला उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. तसेच बेरोजगार युवकांनाही दुकान टाकण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे.
कसनसूर मार्गालगतची जागा एटापल्ली पंचायत समितीची आहे. मात्र या ठिकाणी काही दुकानदारांनी अतिक्रमण करून मोठमोठी दुकाने लावली होती. दिवसेंदिवस अतिक्रमणाचा विस्तार होत चालला होता. मार्गालगतच अतिक्रमण असल्याने वाहतूक कोंडीचीही समस्या निर्माण झाली होती. एटापल्लीचे विद्यमान गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांनी पुढाकार घेत या ठिकाणचे अतिक्रमण हटविले. अतिक्रमण हटविताना स्थानिक दुकानदार व राजकीय व्यक्तींचा फार मोठा विरोध झाला. मात्र गज्जलवार यांनी या विरोधाला न जुमानता अतिक्रमण काढले. अतिक्रमण काढल्यानंतर ती जागा मोकळी असती तर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण होण्याचा धोका होता. त्यामुळे पंचायत समितीने तत्काळ बांधकामाला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात सुमारे ४१ गाळ्यांचे बांधकाम सुरू झाले आहे. सदर बांधकाम आता पाच फुटापर्यंत पोहोचले आहे.
स्थानिक बेरोजगार युवकांना अत्यंत कमी भाडे तत्त्वावर सदर गाळे दुकान लावण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सुमारे ४१ दुकानांचे गाळे असल्याने एक स्वतंत्र बाजारपेठ निर्माण होणार आहे. ४१ गाळ्यांमधील दुकानांमध्ये सर्वच वस्तू मिळणार असल्याने ग्राहक व नागरिक इतरत्र न भटकता पंचायत समिती परिसरातील बाजारपेठेत येतील. त्यामुळे गाळ्यांमधील दुकानांमधील विक्री वाढून याचा फायदा दुकानदारांना होणार आहे. तसेच या गाळ्यांमध्ये दुकानासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा पुरविल्या जाणार आहेत.
कमी भाड्यात दुकानगाळे उपलब्ध होणार असल्याने काही बेरोजगार युवक आतापासूनच पंचायत समितीशी संपर्क साधत आहेत. बांधकाम झाल्याबरोबर गाळे उपलब्ध होणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी एटापल्ली पंचायत समितीला नुकतीच भेट दिली. यावेळी दुकानगाळ्यांचीही पाहणी केली. एकाच रांगेत असलेले दुकानगाळे पाहून जिल्हाधिकारी अवाक् झाले. पंचायत समितीच्या बांधकामाची प्रशंसा केली. इतरही पंचायत समितीने अशा प्रकारचा अभिनव उपक्रम राबवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पंचायत समितीला शासनाकडून अत्यंत कमी प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे पंचायत समितीचे महत्त्व कमी होत चालले आहे. मात्र एटापल्ली पंचायत समितीने स्वत:चे दुकानगाळे बांधून शासनाला उत्पन्नाचे साधन मिळवून दिले आहे. एटापल्ली पंचायत समितीच्या वतीने पेट्रोलपंप सुद्धा चालविला जातो. पेट्रोलपंप चालविणारी एटापल्ली पंचायत समिती ही राज्यातील एकमेव पंचायत समिती आहे.

Web Title: 41 shop chairs for unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.