४१७ घरकूल मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2017 12:47 AM2017-01-09T00:47:30+5:302017-01-09T00:47:30+5:30
राज्याच्या आदिवासी विकास विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या शबरी आदिवासी घरकूल योजनेंतर्गत ...
प्रशासनातर्फे कार्यवाही सुरू : शबरी आदिवासी घरकूल योजना
गडचिरोली : राज्याच्या आदिवासी विकास विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या शबरी आदिवासी घरकूल योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या १० तालुक्यात सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात एकूण ४१७ घरकुलांना डिसेंबरअखेर मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. करारनामे घेणे तसेच आॅनलाईन नोंदणीची कार्यवाही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत गतीने सुरू आहे.
अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी शबरी आदिवासी घरकूल योजना २८ मार्च २०१३ च्या शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आली आहे. सुरूवातीला या योजनेंतर्गत घराच्या अनुदानाची किमत मर्यादा ग्रामीण क्षेत्रासाठी ७० हजार रूपये होती. सदर योजना ही आता ग्राम विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या इंदिरा आवास योजनेच्या धर्तीवर राबविण्यात येत आहे. त्यानंतर १ एप्रिल २०१३ पासून या घरकुलाच्या अनुदानाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली व ती एक लाख रूपये इतकी करण्यात आली. आता ६ जानेवारी २०१७ च्या आदिवासी विकास विभागाच्या नव्या शासन निर्णयानुसार शबरी आदिवासी घरकूल योजनेंतर्गत ग्रामीण भागाकरिता एक लाख ३२ हजार रूपयांचे अनुदान संबंधित लाभार्थ्यांना दिले जाणार आहे. अनुदान वाढल्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या आदिवासी कुटुंबधारकांकडून या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. अद्यापही भामरागड, कोरची, एटापल्ली, धानोरा,अहेरी तालुक्याच्या दुर्गम भागातील अनेक आदिवासी कुटुंबधारकांकडे राहण्यासाठी पक्के घर नाही. शिवाय दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची पुरेशा प्रमाणात माहिती नाही. त्यामुळे दुर्गम भागातील अनेक आदिवासी नागरिक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित असल्याचे दिसून येते. शबरी आदिवासी घरकूल योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा, तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनजागृती करणे अत्यावश्यक आहे. आदिवासी विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही आदिवासी नागरिकांसाठी असलेल्या योजनांची माहिती गावागावात पोहोचविणे आवश्यक आहे. घरकुल लाभासाठी आता लाभार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
५२६ लाभार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी
शबरी आदिवासी घरकूल योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाकरिता ८४० घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट शासनाने प्रशासकीय विभागांना दिले आहे. यापैकी ५२६ लाभार्थ्यांनी घरकूलच्या लाभासाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील ५९, आरमोरी ४३, भामरागड ५७, चामोर्शी ११८, देसाईगंज ५, धानोरा ७८, एटापल्ली ५८, गडचिरोली ४८, कोरची ७, कुरखेडा १३, मुलचेरा २९, सिरोंचा तालुक्यातील ११ लाभार्थ्यांचा समावेश आहे.