४२ गावांना पुराचा फटका

By admin | Published: May 23, 2014 11:53 PM2014-05-23T23:53:39+5:302014-05-23T23:53:39+5:30

जिल्ह्यातील ४२ गावांना पावसाळ्यादरम्यान पुराचा फटका बसण्याची शक्यता असून आकस्मिक स्थितीत वेळीच उपाययोजना करून पुढील हानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

42 villages suffered floods | ४२ गावांना पुराचा फटका

४२ गावांना पुराचा फटका

Next

प्रशासन सज्ज : सरासरी २१४८.०३ मिमी पडतो पाऊस

गडचिरोली : जिल्ह्यातील ४२ गावांना पावसाळ्यादरम्यान पुराचा फटका बसण्याची शक्यता असून आकस्मिक स्थितीत वेळीच उपाययोजना करून पुढील हानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. प्रत्येक अधिकार्‍याकडे स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व सीमेवरून वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती या पाच मोठ्या नद्या वाहतात. त्याचबरोबर बांडे, पर्लकोटा, गाढवी, खोब्रागडी, पाल, कठाणी, दिना यासुद्धा नद्या आहेत. जिल्ह्यातील शेकडो गावे नदींच्या काठी किंवा खोलगट भागामध्ये वसली आहेत. पावसाळ्यादरम्यान पावसाचे प्रमाण जास्त झाल्यानंतर या गावांमध्ये पुराचे पाणी शिरून जीवित व आर्थिक हानी होत असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. मागील वर्षी तर सततच्या पुरामुळे सुमारे चार महिने जनजीवन विस्कळीत झाले होते. दरवर्षी जिल्ह्यातील जवळपास ४२ गावांना पुराचा फटका बसतो. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील शिवणी, कृपाळा, गोविंदपूर, मुलचेरा तालुक्यातील येल्ला, गोमणी, चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव, कळमगाव, आष्टी, अनखोडा, आरमोरी तालुक्यातील वघाळा, शिवणी बु., सायगाव, डोंगरसावंगी, वैरागड, देसाईगंज तालुक्यातील देसाईगंज, विसोरा, सावंगी, अरततोंडी, किन्हाळा, कुरखेडा तालुक्यातील कुरखेडा, मोहगाव, सायटोला, कुंभीटोला, मालेवाडा, बांधगाव, अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली, गडअहेरी, चिंचगुंडी, दामरंचा, एटापल्ली तालुक्यातील हिंदूर, हिक्केर, झारेवाडा, भामरागड तालुक्यातील भामरागड, सिरोंचा तालुक्यातील मृदूकृष्णापूर, मोयाबिनपेठा, दर्शेवाडा, परसेवाडा, अंकिसा, पेडलाया, असरअल्ली, सोमनूर या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये यापूर्वी पूर येऊन मोठी जीवित व आर्थिक हानी झाली होती. यावर्षीच्या पावसाळ्यात पूर येण्यापूर्वीच नागरिकांना सजग करता यावे, नागरिकांना वेळीच सुरक्षित स्थळी हलविता यावे, मागील वर्षीप्रमाणे जीवितहानी होऊ नये यासाठी प्रशासनाने आतापासूनच तयारी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: 42 villages suffered floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.