यावर्षी जिल्ह्याला मिळणार ४५ पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 01:11 AM2018-04-07T01:11:23+5:302018-04-07T01:11:23+5:30

जिल्ह्यातील अनेक मार्गांवरील नदी आणि नाल्यांवर पूलच नसल्यामुळे पावसाळ्याचे चार-पाच महिने त्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे खंडित होते.

45 bridges to be made in the district this year | यावर्षी जिल्ह्याला मिळणार ४५ पूल

यावर्षी जिल्ह्याला मिळणार ४५ पूल

Next
ठळक मुद्देअनेक मार्गांवरील अडचण : वाहतुकीचा मार्ग होणार मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील अनेक मार्गांवरील नदी आणि नाल्यांवर पूलच नसल्यामुळे पावसाळ्याचे चार-पाच महिने त्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे खंडित होते. काही गावांना जाण्यासाठी तर वर्षभर पाण्यातूनच वाट काढत किंवा होडीने जावे लागते. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासूनची ही अडचण आता बऱ्याच प्रमाणात दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी यावर्षी तब्बल ४५ पुलांची उभारणी करण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
या ४५ पुलांमध्ये ३३ पूल डावी कडवी विचारसरणीअंतर्गत रस्ते जोडणी प्रकल्पातून (प्रधानमंत्री ग्रामसडक योजना) होणार आहेत. याशिवाय ६ पूल आदिवासी उपयोजनेतून मिळणाºया निधीतून, ३ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्य मार्ग निधीतून तर ३ पूल नाबार्डकडून प्राप्त निधीतून उभारले जाणार आहेत. या पुलांच्या बांधकामासाठी सव्वाशे कोटींपेक्षा जास्त खर्च होणार आहे.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून होणाऱ्या ३३ पुलांमध्ये अहेरी तालुक्यात २, भामरागड तालुक्यात ४, एटापल्ली तालुक्यात १५, सिरोंचा तालुक्यात ४, गडचिरोली तालुक्यात ४ तर कोरची तालुक्यात ४ पूल होणार आहेत. हे सर्व पूल ८६ कोटी २५ लाख रुपयांचे आहेत. आदिवासी उपयोजनेतून मंजूर ६ पुलांमध्ये मुलचेरा तालुक्यात १ तर सिरोंचा तालुक्यात ५ पूल होणार आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्य मार्ग निधीतून यावर्षीच्या अर्थसंकल्पात ३ पूल मंजूर झाले. त्यात भामरागड तालुक्यातील जुवी नाल्यावर मोठ्या आणि ५ लहान पुलांचे बांधकाम केले जाणार आहे. एटापल्ली-परसलगोंदी-गट्टा मार्गावर सुरजागड नाल्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम होणार आहे. तसेच कोरची-पुराडा-मालेवाडा-येरकड-गोदलवाही-कसनसूर-एटापल्ली-आलापल्ली रस्त्यावरील झुरी नाल्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम केले जाणार आहे. या तीन पुलांसाठी २९.५ कोटींची तरतूद केली आहे.
नाबार्ड अंतर्गत सार्वजनिक बांधकाम मंडळाकडून मंजूर ३ पुलांमध्ये वडसा तालुक्यातील तुलसी-पोटेगाव रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम, धानोरा तालुक्यातील कारकारका पोचमार्ग ते राज्य महामार्गाला जोडणाºया रस्त्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम आणि एटापल्ली तालुक्यातील गोदलवाही मिचगाव पुलखल, पेंढरी जारावंडी कसनसूर रस्त्यावरील कंडोली नाल्यावर पुलाचे बांधकाम केले जाणार आहे. या पुलांची किंमत १० कोटी २९ लाख रुपये राहणार आहे.
या सर्व पुलांमुळे पावसाच्या दिवसात बंद होणारे जिल्ह्यातील अनेक मार्ग बारमाही वाहतुकीसाठी सुरू होतील. त्यामुळे रहदारीची अडचण दूर होऊन अनेक गावे मुख्य मार्गाशी जोडले जाणार आहेत. यातून गावकºयांच्या विकासाचा मार्गही प्रशस्त होणार आहे.
या मार्गावरील पुलांचे होणार काम
अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा-देचली, भामरागड तालुक्यातील हलवेर-कोठी, कमलापूर-दामरंचा, मन्नेराजाराम-ताडगाव, एटापल्ली तालुक्यातील हालेवारा-कोठी तसेच घोट-रेगडी-कसनसूर आदीसह विविध मार्गावरील अनेक पुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, विद्यमान शासनाने वाहतूक व दळणवळण वाढविण्याच्या उद्देशाने रस्ते निर्मितीच्या कामावर भर दिला आहे. पूल बांधकामासाठी प्राधान्य दिले जात आहे. रस्ता हा विकासाचा आरसा असे म्हटले जाते. अपघातावर आळा घालण्यासाठी सुस्थितीत रस्ते व पुलाची निर्मिती शासनामार्फत करण्यात येणार आहे.
अहेरी उपविभागाला झुकते माप
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत अहेरी उपविभागाच्या भामरागड, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा आदी तालुक्यातील मार्गांवर पूल निर्मितीचे काम प्राधान्याने मंजूर करण्यात आले आहे. नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागात पूल निर्मितीतून दळणवळणाचे जाळे निर्माण करण्यावर शासनाचा भर आहे.

Web Title: 45 bridges to be made in the district this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.