४५ टक्के शेतकरी अत्यल्प भूधारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:00 AM2020-05-25T05:00:00+5:302020-05-25T05:00:59+5:30

देशाच्या स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात जंगलतोड करून त्या जमिनीवर शेती करण्याला सुरूवात झाली. त्यामुळे शेतीचे क्षेत्र वाढले. त्याचबरोबर लोकसंख्यासुद्धा वाढल्याने शेतीचे तुकडे पडण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख ३४ हजार ८३३ शेतकरी आहेत. त्यापैकी सुमारे ५७ हजार ३४२ शेतकऱ्यांकडे १ हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन आहे.

45% farmers have very small land holders | ४५ टक्के शेतकरी अत्यल्प भूधारक

४५ टक्के शेतकरी अत्यल्प भूधारक

Next
ठळक मुद्देकृषी विभागाची माहिती : आधुनिक तंत्रज्ञान वापरताना येतात मर्यादा;अनेकांनी सोडली शेती

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीचे तुकडे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्यास्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांच्या सुमारे ४५ टक्के शेतकऱ्यांकडे १ हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन आहे. शेतजमीन कमी असल्याने याठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे संबंधित शेतकऱ्याला कठिण झाले आहे.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात जंगलतोड करून त्या जमिनीवर शेती करण्याला सुरूवात झाली. त्यामुळे शेतीचे क्षेत्र वाढले. त्याचबरोबर लोकसंख्यासुद्धा वाढल्याने शेतीचे तुकडे पडण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख ३४ हजार ८३३ शेतकरी आहेत. त्यापैकी सुमारे ५७ हजार ३४२ शेतकऱ्यांकडे १ हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास कमी मनुष्यबळात अधिक व दर्जेदार उत्पादन घेणे शक्य होते. मात्र शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान महाग राहत असल्याने अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला ते खरेदी करणे शक्य होत नाही. परिणामी शेतीचा विकास रखडला आहे. अल्प शेतीतून वर्षभराची गूजरान होईल, एवढे उत्पन्नसुद्धा मिळत नसल्याने काही शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतीचे होत असलेले तुकडीकरण ही गंभीर समस्या बनत चालली आहे.
शेतीकडे पाठ फिरविलेले शेतकरी दुसºया शेतकºयाला शेतजमीन कसण्यासाठी देतात. एक ते दोन वर्षाचा करार राहत असल्याने दुसरा शेतकरीसुद्धा या शेतीत नवीन तंत्रज्ञान बसवू शकत नाही. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी धान शेतीकडेच विशेष लक्ष देत असल्याचे दिसून येते.

३६ हजार शेतकऱ्यांकडे २५ टक्के शेतजमीन
दोन व त्यापेक्षा अधिक हेक्टर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात ३६ हजार २५ एवढी आहे. जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांच्या हे प्रमाण २५ टक्के एवढे आहे. हे शेतकरी काही प्रमाणात आपल्या शेतीत अत्याधुनिक सुविधा निर्माण करीत आहेत. तसेच वर्षभराची गूजरान शेतीच्या माध्यमातून होत असल्याने ते शेतीकडे विशेष लक्ष देत आहेत.

गटशेतीवर शासनाचा भर
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला शेतीचे आधुनिक महागडे तंत्रज्ञान खरेदी करणे शक्य होत नाही. तसेच एका शेतकºयाला लाखो रूपयांचे तंत्रज्ञान अनुदानावर देणे शासनालाही परवडत नाही. त्यामुळे शासनाने गट शेतीवर भर दिला आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे गट तयार केले जात आहे. या शेतकरी गटाला शासनाकडून विविध प्रकारच्या सुविधा व तंत्रज्ञान दिले जात आहे. या तंत्रज्ञानाचा वापर गटातील शेतकरी करतात. त्यामुळे शेतीचा विकास होण्यास मदत होत आहे.

Web Title: 45% farmers have very small land holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.