निमरड टोलातील ४५ शेळ्या दगावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:50 AM2018-01-20T00:50:22+5:302018-01-20T00:50:33+5:30
चामोर्शी तालुक्यातील निमरड टोला (रेखेगाव) येथील शेळ्या व गायींना अज्ञात रोगाची लागण झाली असल्याने मागील आठ दिवसात ४५ शेळ्या व पाच गायींचा मृत्यू झाला. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव (म.) : चामोर्शी तालुक्यातील निमरड टोला (रेखेगाव) येथील शेळ्या व गायींना अज्ञात रोगाची लागण झाली असल्याने मागील आठ दिवसात ४५ शेळ्या व पाच गायींचा मृत्यू झाला. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
निमरड टोला येथील बालाजी राऊत यांच्या २० शेळ्या, विस्तारी अन्नावार यांच्या २१ शेळ्या, भारत देऊरघरे यांचे चार शेळ्या, कुक्सू सरपे यांची एक गाय, देवाजी सरपे यांच्या दोन गायी, दिलीप सरपे यांच्या दोन गायी असे एकूण ५० जनावरे मृत्यूमुखी पडले आहेत. मागील आठ दिवसांपासून अज्ञात रोगाने शेळ्या व गायींचा मृत्यू होत असताना गावातील नागरिकांनी याबाबतची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना न देताच गावटी उपचार करीत होते. एकामागून एक शेळ्यांचा मृत्यू होत असल्याचे लक्षात घेऊन गावातील एका नागरिकाने याबाबतची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. पशुवैद्यकीय अधिकाºयांनी गावात जाऊन आजारी जनावरांवर उपचार केले.
पंचायत समिती सदस्य रेखा नरोटे यांनी सुद्धा पशुपालकांची भेट घेतली. यावेळी ग्रा.पं. सदस्य सोमनाथ पिपरे, बबीता वासेकर, खेडूसिंग खसावत, रमेश नरोटे, मोरेश्वर वासेकर उपस्थित होते. गावातील जनावरांची गंभीर स्थिती लक्षात घेऊन शनिवारी या गावात औषधोपचा शिबिर आयोजित केले जाणार असल्याची माहिती पशुवैैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. नेमक्या कोणत्या रोगामुळे जनावरांचा मृत्यू झाला, हे मात्र कळू शकले नाही. जनावरांच्या मृत्यूमुळे पशुपालक अडचणीत आले आहेत. संबंधित पशुपालकांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, त्याचबरोबर पशुंच्या देखभालीबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी आहे.