गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा; तरुणाला उच्च शिक्षणासाठी ४५ लाखांची शिष्यवृत्ती जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 04:39 PM2023-03-22T16:39:03+5:302023-03-22T16:49:15+5:30

जगातील १५ स्कॉलर्समध्ये निवड : वंचित, तळागाळातील घटकांसाठीच्या कामाची परदेशात दखल

45 lakh scholarship announced for Gadchiroli's Bodhi Ramteke for higher education abroad | गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा; तरुणाला उच्च शिक्षणासाठी ४५ लाखांची शिष्यवृत्ती जाहीर

गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा; तरुणाला उच्च शिक्षणासाठी ४५ लाखांची शिष्यवृत्ती जाहीर

googlenewsNext

गडचिरोलीआदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील ॲड. बोधी शाम रामटेके या तरुणास परदेशात उच्चशिक्षणासाठी युरोपियन शिक्षण व संस्कृती एग्जीक्यूटिव कमीशनमार्फत देण्यात येणारी 'इरासमूस मुंडस' ही ४५ लाखांची जागतिक प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. जागतिक प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या या तरुण वकिलाच्या कर्तुत्वाने चामोर्शी व गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. 

या शिष्यवृत्तीकरता जगभरातून १५ स्कॉलर्सची निवड करण्यात आली. यात चामोर्शी येथील बोधी रामटेकेचाही समावेश आहे. 'ह्यूमन राईट्स प्रॅक्टिस अँड पॉलिसी' या अभ्यासक्रमासाठी स्विडन येथील युनिव्हर्सिटी ऑफ गॉथेनबर्ग, स्पेन येथील युनिव्हर्सिटी ऑफ देऊस्टो, लंडन येथील युनिव्हर्सिटी ऑफ रोहम्पटन, व नार्वे येथील युनिव्हर्सिटी ऑफ ट्रॉमसो या चार देशातील जागतिक विद्यापीठात पुढील दोन वर्षे तो उच्चशिक्षण घेणार आहे. यासाठीच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी युरोपीयन कमीशनने घेतली आहे. 

बोधीचे प्राथमिक शिक्षण चामोर्शी व नवोदय विद्यालयात झाले. पुण्यातील आय.एल.एस.विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेतले. दरम्यान समविचारी मित्र व ब्रिटिश सरकारची चेवेनिंग शिष्यवृत्तीधारक ॲड. दीपक चटप आणइ ॲड. वैष्णव इंगोले यांच्यासोबत 'पाथ' या सामाजिक संस्थेची स्थापना केली. त्याद्वारे राज्यातील दुर्बल घटकांच्या मूलभूत प्रश्नांना कायद्याने वाचा फोडण्याचे काम केले. त्याच्या सामाजिक कामाची दखल युरोपीय देशांनी घेतली आहे.

या कामांची जागतिक दखल

• गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील आदिम कोलाम व माडिया समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर मानवाधिकार आयोग व उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन प्रश्नांना वाचा फोडली.
• कोरो इंडिया या संस्थेद्वारा समता फेलोशीप मिळवून संविधानिक मुल्यांवर काम व 'संविधानिक नैतिकता' हा ऑनलाईन कोर्स तयार करून राज्यातील १२०० विद्यार्थ्यांना संविधानविषयक प्रशिक्षण दिले.
• गडचिरोलीतील अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील गरोदर महिलांना आरोग्यविषयक सुविधा मिळाव्या, यासाठीच्या याचिका महत्वपूर्ण ठरल्या.
• आदिम समुदायांना न्यायव्यवस्थेत येणा-या अडचणींवर संशोधन करुन इजिप्त देशात आतंरराष्ट्रीय परिषदेत अहवाल सादर केला.
• दुर्गम गावात आवश्यक रस्ते व पुल यांबाबत उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश यांना पत्र लिहिले. जनहित याचिकेच्या माध्यमातून गडचिरोलीतील दुर्गम वेंगणुर भागातील १५०० नागरिकांना रस्ता व पुल मिळावा यासाठी न्यायिक लढा दिला.
• कायद्याची सोप्या भाषेत माहिती देणारे 'न्याय' हे पुस्तक लोकप्रिय व वंचित घटकांसाठी महत्वपूर्ण ठरले. 
• दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात विधी संशोधक म्हणून करत असलेले काम उल्लेखनीय ठरले. 

तळागाळातील घटकांसाठीच शिक्षणाचा उपयोग

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा व आई-वडील-मित्रांचे प्रोत्साहन माझ्या वाटचालीत महत्त्वपूर्ण आहे. समाजातील वंचित, आदिवासी समुदायाचे प्रश्न प्रत्यक्ष जमीनीपातळीवर काम करतांना अनुभवले. उच्चशिक्षण घेवून जागतिक स्तरावर येथील प्रश्न मांडून सोडवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व्हावा, हे प्रत्येक सुशिक्षितांचे स्वप्न असायला हवे. युरोपीयन देशांनी विश्वास दाखवून दिलेली ही संधी पुढील काळात वंचित घटकांसाठी रचनात्मक काम उभे करण्यासाठी बळ देणारे आहे. माझ्या उच्चशिक्षणाचा उपयोग तळागळातील घटकांसाठी व्हावा यासाठी मी कार्यरत राहिल.

- ॲड.बोधी रामटेके
 

Web Title: 45 lakh scholarship announced for Gadchiroli's Bodhi Ramteke for higher education abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.