४५ टक्के विद्यार्थी गणितात कच्चे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:28 AM2019-01-21T00:28:05+5:302019-01-21T00:30:11+5:30
डीआयईसीपीडी अंतर्गत घेण्यात आलेल्या अध्ययनस्तर निश्चिती चाचणीत ४५ टक्के विद्यार्थी गणितात कच्चे असल्याचे दिसून आले आहे. ५७ टक्के विद्यार्थ्यांना समजपूर्वक उतारा वाचता येत असल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : डीआयईसीपीडी अंतर्गत घेण्यात आलेल्या अध्ययनस्तर निश्चिती चाचणीत ४५ टक्के विद्यार्थी गणितात कच्चे असल्याचे दिसून आले आहे. ५७ टक्के विद्यार्थ्यांना समजपूर्वक उतारा वाचता येत असल्याचे दिसून आले.
जिल्हाभरातील विद्यार्थ्यांची इयत्तेनुसार शैक्षणिक प्रगती कळावी, यासाठी अध्ययनस्तर निश्चिती हा उपक्रम घेतला जातो. या उपक्रमांतर्गत भाषा व गणित या दोन विषयांची चाचणी घेतली जाते. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील तिसरी अध्ययनस्तर निष्पत्ती चाचणी १० ते १५ डिसेंबर या कालावधीत घेण्यात आली.
जिल्हाभरात पहिली ते आठवीचे एकूण १ लाख २९ हजार २२२ विद्यार्थी आहेत. त्यापैकी १ लाख २६ हजार ९८९ विद्यार्थ्यांनी अध्ययनस्तर निष्पत्तीची चाचणी दिली. भाषा विषयाची चाचणी घेताना भाषण, संभाषण, शब्द वाचन, वाक्य वाचन, समजपूर्वक उतारा वाचन घेतले जाते. भाषा विषयाच्या चाचणीत ५७ टक्के विद्यार्थी त्या-त्या वर्गानुसार कौशल्य प्राप्त केले असल्याचे दिसून आले. उर्वरित ४३ टक्के विद्यार्थी भाषा विषयाचे काही कौशल्य प्राप्त केले नसल्याचे दिसून आले. गणित विषयामध्ये संख्याज्ञान, बेरीजस्तर, वजाबाकी स्तर, गुणाकार स्तर, भागाकार या चाचण्या घेतल्या जातात. यामध्ये ५५ टक्के विद्यार्थ्यांनी गणिताचे कौशल्य आत्मसात केले आहे. मात्र ४५ टक्के विद्यार्थी मागे असल्याचे दिसून आले आहे.
जिल्हाभरातील व राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा अध्ययनस्तर निश्चितीच्या माध्यमातून कळत असल्याने या चाचणीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होतील, या उद्देशाने शाळेकडून प्रयत्न केले जातात. पहिलीचे विद्यार्थी सर्वाधिक मागे असल्याचे दिसून येते. वाढत्या वर्गाबरोबरच त्यांच्यामध्ये भाषा व गणित या दोन्ही विषयांमध्ये त्यांनी प्रगती केली असल्याचे दिसून येते.
भाषण, संभाषणात विद्यार्थी पुढे
भाषा विषयामध्ये भाषण, संभाषण कौशल्याची चाचणी घेतली जाते. या कौशल्यात बहुतांश विद्यार्थी पुढे आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांना ९० पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. शब्द वाचनमध्ये जवळपास ८० ते ९० च्या दरम्यान गुण प्राप्त आहेत. तर वाक्य वाचनमध्येही ७० ते ८० च्या दरम्यान गुण मिळाले आहेत. संख्याज्ञान, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या कौशल्यांमध्ये विद्यार्थ्यांना ८० ते ९० च्या दरम्यान गुण मिळाले आहेत. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यातील स्थिती चांगली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.