४५२ गावांत गेली स्कूलबस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:09 AM2019-05-09T00:09:13+5:302019-05-09T00:09:48+5:30
जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी सुरू असलेल्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यात २०१८-१९ या वर्षात खर्च केलेल्या १५ कोटी ३३ लाख रुपयांच्या निधीपैकी सर्वाधिक निधी (५ कोटी ३५ लाख रुपये) विद्यार्थिनींना शाळेपर्यंत आणि शाळेतून गावापर्यंत सोडणाऱ्या स्कूल बसेसवर खर्च झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी सुरू असलेल्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यात २०१८-१९ या वर्षात खर्च केलेल्या १५ कोटी ३३ लाख रुपयांच्या निधीपैकी सर्वाधिक निधी (५ कोटी ३५ लाख रुपये) विद्यार्थिनींना शाळेपर्यंत आणि शाळेतून गावापर्यंत सोडणाऱ्या स्कूल बसेसवर खर्च झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात ४५२ गावांमधील ५९७८ विद्यार्थिनींनी एसटी महामंडळाच्या त्या स्कूल बसेसचा वापर केल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेने घेतली आहे.
जिल्ह्यात देसाईगंज वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये मानव विकास कार्यक्रम राबविला जात आहे. यातून रोजगार निर्मितीला चालना देणारे प्रशिक्षण, साहित्य पुरवठ्यासारख्या योजना, शेतकऱ्यांना कृषीपयोगी साहित्य वाटप, आरोग्यविषयक शिबिरे यासह विद्यार्थिनींना शाळेपर्यंत पोहोचविण्यासाठी एसटी महामंडळाच्या निळ्या रंगाच्या स्कूल बसची सुविधा देण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रत्येक गावात माध्यमिक शाळा नाही. त्यामुळे विद्यार्थिनींनी वरच्या वर्गाची सोय असणाºया जवळच्या किंवा तालुक्याच्या गावात जाण्यासाठी प्रशासनाकडून मानव विकासच्या निधीतून एसटी महामंडळाच्या निळ्या गाड्यांच्या विशेष फेºया शाळेच्या वेळेवर सोडल्या जातात.
या बसेसमध्ये विद्यार्थिनींना शाळेपर्यंत मोफत प्रवास करता येतो. गेल्या आर्थिक वर्षात १८८ शाळांच्या ५९७८ विद्यार्थिनींनी या सुविधेचा लाभ घेतला.
२९१८ विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये बस जाण्याइतपत मार्गच नाही. त्यामुळे मानव विकास कार्यक्रमातील स्कूल बसेसमधून प्रवास करणे त्या गावातील विद्यार्थिनींना शक्य होत नाही. अशा स्थितीत सायकलने प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे मार्च २०१९ अखेर मानव विकास कार्यक्रमातून २९१८ विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. त्यात १२६ शाळांमधील विद्यार्थिनी असून त्यांच्या सायकलींवर ८७ लाख ५४ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. या योजनेत विद्यार्थिनींनी आधी सायकल विकत घेऊन त्याचे बिल सादर करायचे होते. त्यानुसार सायकल विकत घेणाºया प्रत्येक विद्यार्थिनीच्या खात्यात ३ हजार रुपये टाकण्यात आले.