४६ बंगाली शाळा चालताहेत पुस्तकांविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:44 AM2017-07-18T00:44:34+5:302017-07-18T00:44:34+5:30
चामोर्शी व मुलचेरा तालुक्यात बंगाली माध्यमाच्या एकूण ४६ शाळा आहेत.
शिक्षण विभाग म्हणते, प्रिंटिंग सुरू : ३ हजार १५० विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जिल्हा परिषदेचा खेळ
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चामोर्शी व मुलचेरा तालुक्यात बंगाली माध्यमाच्या एकूण ४६ शाळा आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पुरविण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेवर आहे. शाळा सुरू होऊन २० दिवसांचा कालावधी उलटला तरी अजूनपर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचली नाहीत. याबाबत पालकांनी जिल्हा परिषदेकडे विचारणा केली असता, पाठ्यपुस्तकांची प्रिंटिंग सुरू आहे, असे उत्तर जिल्हा परिषदेमार्फत दिले जात आहे. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिवाळीनंतर उपलब्ध करून देणार काय, असा उपहासात्मक प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
मुलचेरा व चामोर्शी तालुक्यात बंगाली समाज वास्तव्यास आहे. या नागरिकांची मातृभाषा बंगाली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण विभागाने मुलचेरा तालुक्यात २३ व चामोर्शी तालुक्यात २३ अशा एकूण ४६ शाळांमध्ये बंगाली माध्यम सुरू केले आहे. बंगाली माध्यमाचे शिक्षण पहिली ते पाचवीपर्यंत दिले जाते. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांना हिंदी माध्यमाच्या शाळांमध्ये टाकले जाते. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. राज्यभरात बंगाली माध्यमाच्या शाळा केवळ गडचिरोली जिल्ह्यात आहेत. एवढ्या कमी विद्यार्थ्यांसाठी पुस्तके छापणे पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम मंडळाला शक्य नाही. त्यामुळे बंगाली माध्यमाची पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याची जबाबदारी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागावर सोपविण्यात आली आहे.
शाळेच्या पहिल्या दिवशीच पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावी, यासाठी इतर माध्यमाची पुस्तके उन्हाळ्यातच पुरविली जातात व शाळेच्या पहिल्याच दिवशी त्याचे वितरण केले जाते. मात्र बंगाली माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग नेहमीच अन्याय करीत आला आहे. आजपर्यंत कधीच पहिल्या दिवशी बंगाली माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध झाली नाहीत. यावर्षी सुध्दा शाळा सुरू होऊन आता २० दिवसांचा कालावधी उलटला तरी पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली नाहीत. याबाबत संबंधित विद्यार्थ्यांचे पालक जिल्हा परिषद प्रशासनाच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. जिल्हा परिषदेने तत्काळ पुस्तकांचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. मात्र बंगाली माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पुस्तकेच उपलब्ध नाही. त्यामुळे सदर विद्यार्थी अध्यापन कसे करीत असावे व त्यांची गुणवत्ता कशी काय वाढणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. दस्तरखुद्द शिक्षणाधिकाऱ्यांनी शांतीग्राम बंगाली माध्यमाच्या शाळेला भेट दिली असता, चवथ्या वर्गाच्या एकाही विद्यार्थ्याला बंगाली भाषा वाचता आली नाही.
नियोजनाचा अभाव
बंगाली भाषेची पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेवर आहे. त्यामुळे उन्हाळ्यातच नियोजन करून पाठ्यपुस्तके छापल्यास शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देणे शक्य आहे. मात्र शिक्षण विभाग शाळा सुरू झाल्याशिवाय पाठ्यपुस्तके छपाईचे काम सुरू करीत नाही. पावसाळा सुरू झाल्यानंतर ऐन वेळेवर घर बांधण्यासाठी सुरू करणाऱ्या माकडाची फजिती होते, या कहाणीच्या माध्यमातून वेळेचे महत्त्व सांगणारा शिक्षण विभाग मात्र वेळेकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
बंगाली माध्यमाच्या पाठ्यपुस्तकांची प्रिंटिंग करण्याचे काम शिक्षण विभागाने सुरू केले आहे. पाठ्यपुस्तकांचा तत्काळ पुरवठा करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नरत आहे. प्रिंटिंग होताच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातील.
- एम. एन. चलाख,
प्रभारी शिक्षणाधिकारी, गडचिरोली