गडचिरोलीतील ४६ ग्राम पंचायती अव्वल

By Admin | Published: June 10, 2017 01:51 AM2017-06-10T01:51:16+5:302017-06-10T01:51:16+5:30

सन २०१६-१७ या वर्षात ग्राम पंचायतींच्या गृहकर वसुलीत भामरागड तालुका अव्वल ठरला आहे.

46 Gram Panchayatis of Gadchiroli | गडचिरोलीतील ४६ ग्राम पंचायती अव्वल

गडचिरोलीतील ४६ ग्राम पंचायती अव्वल

googlenewsNext

१०० टक्के गृहकर वसुली : नक्षलग्रस्त एटापल्ली, भामरागड तालुका आघाडीवर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सन २०१६-१७ या वर्षात ग्राम पंचायतींच्या गृहकर वसुलीत भामरागड तालुका अव्वल ठरला आहे. तीव्र नक्षलग्रस्त असतानाही या तालुक्यातील सर्व १९ ग्राम पंचायतींनी १०० टक्के कर वसुली केली आहे. तसेच एटापल्ली तालुक्यातील २७ ग्राम पंचायतींनी १०० टक्के कर वसुली करून आघाडी घेतली आहे. पाणी कर वसुलीत कोरची व भामरागड तालुक्याने ३१ मार्च २०१७ पर्यंत आघाडी मिळवित १०० टक्के कर वसुली केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४५६ ग्राम पंचायती आहेत. या सर्व ग्राम पंचायतींची मागील थकबाकी व सन २०१६-१७ या चालू वर्षाची मिळून एकूण १४ कोटी ७४ लाख ८२ हजार ७९० रूपये गृह कराची मागणी होती. ग्राम पंचायतीच्या ३१ मार्च २०१७ अखेरपर्यंत एकूण १० कोटी ८८ लाख ४० हजार २२ रूपयांची कर वसुली केली. या गृहकर वसुलीची सरासरी टक्केवारी ७३.८० आहे. गडचिरोली तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीची गृहकर वसुलीची यावर्षीची टक्केवारी ७१ आहे. आरमोरी तालुक्यातील ३३ ग्राम पंचायतीची गृहकर वसुलीची टक्केवारी ६७ आहे. देसाईगंज तालुक्यातील १९ ग्राम पंचायतीची गृहकर वसुली ६९ व कुरखेडा तालुक्यातील ग्राम पंचायतीची गृहकर वसुलीची टक्केवारी ६९ आहे. कोरची तालुक्यातील २९ ग्राम पंचायतीने ९० टक्के गृहकर वसुली केली असून धानोरा तालुक्यातील ६१ ग्राम पंचायतीने ७९.२९ टक्के गृहकर वसुली केली आहे.
चामोर्शी तालुक्यातील ७५ ग्राम पंचायतीची गृहकर वसुली ७८ टक्के असून मुलचेरा तालुक्यातील १६ ग्राम पंचायतीची गृहकर वसुली ७६.४४ टक्के आहे. अहेरी तालुक्यातील ३९ ग्राम पंचायतींनी यावर्षी ६७ टक्के गृहकर वसुली केली आहे. सिरोंचा तालुक्यातील ३९ ग्राम पंचायतीच्या गृहकर वसुलीची टक्केवारी ७७ आहे.
एटापल्ली तालुक्यात एकूण ३१ ग्राम पंचायती आहेत.
या सर्व ग्राम पंचायतीच्या गृहकर वसुलीची सरासरी टक्केवारी ८९.२७ आहे. विशेष म्हणजे एटापल्ली तालुक्यातील २७ ग्राम पंचायतीने १०० टक्के कर वसुली करून आपले उद्दिष्ट गाठले आहे.
भामरागड तालुक्यातील सर्वच १९ ग्राम पंचायतींनी १०० टक्के गृहकर वसुली केली आहे. तालुक्यातील १९ ग्राम पंचायतीअंतर्गत मागील थकबाकी व चालू वर्षाची मिळून एकूण २५ लाख ३ हजार ६९८ रूपये गृहकर नागरिकांकडून वसुल करायचा होता. ती संपूर्ण रक्कम वसूल करण्यात ग्रामपंचायतींना यश आले आहे. एटापल्ली तालुक्यातील ३१ ग्राम पंचायतीची मागील थकबाकी व चालू वर्षाची मिळून एकूण ३५ लाख ६७ हजार ४७८ रूपये गृहकराची मागणी होती. त्यापैकी ग्राम पंचायतींनी ३१ लाख ८४ हजार ५९९ रूपयांची वसुली केली आहे. शहरी भागातील ग्राम पंचायती करवसुलीत माघारल्या आहेत.

Web Title: 46 Gram Panchayatis of Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.