जूनमध्ये ४६९ मलेरिया रुग्ण; गडचिरोलीत चार तालुके अति जोखमीचे !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 04:42 PM2024-07-10T16:42:25+5:302024-07-10T16:44:15+5:30
कोरडा दिवस पाळा, धोका टाळा : भामरागड तालुक्यात सर्वाधिक उद्रेक
दिलीप दहेलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पावसाळा आला की, विविध रोगांना आमंत्रण मिळते. घाणीचे साम्राज्य, घाण पाण्याचे डबके, तसेच डासांची वाढती उत्पत्ती आदी कारणांमुळे जिल्ह्यात मलेरियाचाही प्रकोप वाढतो. जून महिन्यात जिल्ह्यात तब्बल ४६९ रुग्ण मलेरिया पॉझिटिव्ह आढळून आले. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी चार तालुक्यांत अतिजोखमीची परिस्थिती आहे.
पावसाळा आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे समीकरण ठरलेले आहे. पावसाळ्यात विविध प्रकारच्या आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. साचलेल्या पाण्यातून विविध आजार उद्भवण्याचा धोका अधिक असतो. या दिवसांत डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढते. यापैकी मलेरिया ताप हा एक संसर्गजन्य आजार आहे, जो डासांमुळे होतो. या आजारामध्ये तीव्र तापासोबत इतरही काही लक्षणे दिसून येतात. मलेरिया झाला असता त्या व्यक्तीची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. भामरागड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाकडे नोंद आहे.
हे कायम लक्षात ठेवा..
• मच्छरदाणी लावून नेहमी झोपणे.
• मलेरियाची साथ असेल तर डास चावू नये म्हणून अंगभर कपडे घालणे.
• डास चावू नये म्हणून प्रतिबंधात्मक क्रीम लावणे.
• जंतुनाशक फवारणी सर्व ठिकाणी करून घेणे.
• तापात हलका आहार घेणे आणि औषधांचा कोर्स पूर्ण करणे.
कोणते तालुके संवेदनशील?
घाणीचे साम्राज्य, जंगलालगतच्या गावात हिवतापाच्या डासांची उत्पत्ती अधिक होते. परिणामी गडचिरोली जिल्हयातील चार तालुके हिवतापाच्या बाबतीत अधिक संवेदनशील आहेत. आरोग्य यंत्रणेची या तालुक्यातील गावांवर अधिक नजर असते. भामरागड, एटापल्ली, धानोरा व कोरची ही चार तालुके मलेरियाबाबतीत संवेदनशील आहेत. या तालुक्यातील पावसाळ्यात आढळून येणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या अधिक असते.
मलेरिया होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?
● पाणी साचू देऊ नका: ज्या ठिकाणी पाणी साचते त्या भागात डासांचे प्रमाण वाढते. जुने टायर, जुनी भांडी, कुंड्या यांमध्ये पाणी साचू देऊ नका. घराजवळील सांडपाण्याचा निचरा करणे, पाणी साठू न देणे हा उपाय आहे.
● पौष्टिक आहार घ्या: मलेरिया बाधीत व्यक्तींनी उच्च उष्मांकयुक्त आहार घ्यावा. तांदळाऐवजी गहू आणि बाजरीचे पदार्थ खावे. ताजी फळे आणि भाज्या खाणे देखील फायदेशीर ठरू शकते. बीट, गाजर, पपई, द्राक्ष, बेरी, संत्री यांसारख्या विटामिन 'ए' आणि विटामिन 'सी' समृद्ध फळे आणि भाज्या रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
● प्रथिनांचे प्रमाण वाढवा : मलेरियाच्या बाबतीत उतींचे प्रमाण झपाट्याने संपुष्टात येते, त्यामुळे प्रथिनांचे प्रमाण वाढवण्याची गरज असते. यासाठी उच्च कार्बोहायड्रेट आणि प्रथिनेयुक्त्त आहार फायदेशीर ठरु शकतो.
● हे पदार्थ खाऊ नका: मलेरियाची लागण झाल्यानंतर हिरव्या पालेभाज्या, जाड साल असलेली फळे आणि संपूर्ण धान्य यांसारखे हाय फायबर असलेले पदार्थ खाणे टाळा. यासोबतच तळलेले, मैदा आणि अति गोड पदार्थ खाणे टाळावे.
जिल्ह्यात मलेरियाची लागण थांबवण्यासाठी यंत्रणेकडून पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. ज्या गावात तापाची साथ दिसते, अशा ठिकाणी आरोग्य कर्मचारी पोहोचून रक्त्तनमुने घेऊन निदान करीत आहेत. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांवर लागलीच औषधोपचार केला जात आहे. जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्याकडून सातत्याने हिवताप परिस्थिती व उपचार सुविधेचा आढावा घेतला जात आहे. कोणालाही ताप आला किवा थोडेसे लक्षणे दिसली की, संबंधितांनी तत्काळ आरोग्य कर्मचाऱ्यांकडून रक्ताची तपासणी करावी. पुजाऱ्याकडे न जाता रुग्णालयात जाऊन पूर्ण उपचार घ्यावे.
- डॉ. पंकज हेमके, जिल्हा हिवताप अधिकारी, गडचिरोली.