४८२ विद्यार्थ्यांचे राहणार मॉडेल
By admin | Published: August 7, 2015 01:13 AM2015-08-07T01:13:26+5:302015-08-07T01:13:26+5:30
विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली तसेच माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ते १० आॅगस्ट या कालावधीत इन्स्पायर अवार्ड...
इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शन : शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती
गडचिरोली : विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली तसेच माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ते १० आॅगस्ट या कालावधीत इन्स्पायर अवार्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनात जिल्हाभरातील ८७ शाळांचे ४८२ विद्यार्थी विज्ञानाचे मॉडेल सादर करणार आहेत, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली.
शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने विद्यार्थ्याला मॉडेल तयार करण्यासाठी पाच हजार रूपये दिले जातात. २०१५-१६ साठी जिल्हाभरातील ६३० शाळांनी इन्स्पायर अवार्डसाठी रजिस्ट्रेशन केले होते. मात्र त्यापैकी केवळ ८७ शाळांनीच प्रत्यक्ष मॉडेलविषयी माहिती सादर केल्याने या शाळांमधील ३०५ विद्यार्थ्यांची निवड झाली. २०११-१२, २०१२-१३ व २०१३-१४ या कालावधीत नॉमिनेशन झालेल्या मात्र त्यावर्षी उपस्थित राहू न शकलेले १७७ विद्यार्थी यावर्षी मॉडेल सादर करणार आहेत. विद्यार्थी व शिक्षकांची गैरसोय होऊ नये म्हणून १५ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांचा आजपर्यंत वेळोवेळी आढावा घेण्यात आला आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून आमदार नागो गाणार, आमदार मितेश भांगडिया, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार क्रिष्णा गजबे, जिल्हाधिकारी रणजितकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट, नगराध्यक्ष निर्मला मडके, जि.प. सभापती विश्वास भोवते, अतुल गण्यारपवार, अजय कंकडालवार, सुवर्णा खरवडे व शिक्षण समितीचे सर्व सदस्य विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील, अशी माहिती एन. जे. आत्राम यांनी दिली.सोमवारी समारोप
इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनाचा समारोप १० आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजता करण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, राज्य शिक्षण संस्थंचे संचालक नारायण जोशी, शिक्षण उपसंचालक अनिल पारधी, विजय मुळीक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.