१०२ जागांसाठी ४८३ उमेदवार मैदानात

By admin | Published: October 20, 2015 01:34 AM2015-10-20T01:34:47+5:302015-10-20T01:34:47+5:30

सहा नगर पंचायत निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी २९ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर ४८३ उमेदवार आता

483 candidates in the field for 102 seats | १०२ जागांसाठी ४८३ उमेदवार मैदानात

१०२ जागांसाठी ४८३ उमेदवार मैदानात

Next

गडचिरोली : सहा नगर पंचायत निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी २९ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर ४८३ उमेदवार आता मैदानात राहणार आहे.
पहिल्या टप्प्यात एटापल्ली, चामोर्शी, सिरोंचा, मुलचेरा, अहेरी व भामरागड या सहा ठिकाणी नगर पंचायतीची निवडणूक होत आहे. एकूण ५१३ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. सोमवारी नामांकन अर्ज मागे घेण्याच्या दिवशी एकूण २९ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले. आता सहा नगर पंचायतीच्या १०२ जागांसाठी ४८३ उमेदवार मैदानात शिल्लक राहिले आहेत.
एटापल्ली नगर पंचायतीमध्ये अखेरच्या दिवसापर्यंत १७ जागांसाठी एकूण ११४ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. यापैकी ८ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले. यामध्ये प्रभाग क्र. ७ मधून सुरेश कावळे, भूपेन बाटोर, राकेश समुद्रालवार, राहुल मोहुर्ले, विभुती बिश्वास तर प्रभाग क्र. ११ मधून प्रफुल आईलवार, प्रभाग क्र. १२ मधून राणी बोमकट्टीवार, प्रभाग क्र. १७ मधून विश्वनाथ मडावी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर १०६ उमेदवार मैदानात उरले आहेत.
भामरागड नगर पंचायतीच्या १७ जागांसाठी ६७ उमेदवारी अर्ज होते. त्यापैकी दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता ६५ उमेदवार मैदानात उरले आहे. सिरोंचा येथे १७ जागांसाठी ९२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. एकाही उमेदवाराने रिंगणातून माघार घेतली नाही. त्यामुळे येथे १७ जागांसाठी ९२ उमेदवारांमध्ये चुरस राहणार आहे.
जिल्ह्यातील चामोर्शी नगर पंचायतीच्या निवडणुकीत एकूण ८४ उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामध्ये प्रभाग क्र. ६ मधून माजी ग्रा. पं. सदस्य सोपान नैताम, प्रभाग क्र. ७ मधून मंदा उंदीरवाडे, प्रभाग क्र. ११ मधून नरेंद्र अलसावार, प्रभाग क्र. १३ मधून वर्षा भिवापुरे, प्रभाग क्र. १५ मधून अंजली उरकुडे, प्रभाग क्र. १६ मधून अर्चना रामटेके व मंदाबाई तुरे या ७ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले. विशेष म्हणजे अंजली उरकुडे यांनी प्रभाग क्र. १५ व प्रभाग क्र. १६ मधून दोन नामांकन अर्ज दाखल केले होते. त्यांनी प्रभाग क्र. १५ मधून नामांकन अर्ज मागे घेतला. आता प्रभाग क्रमांक १६ मध्ये त्यांची उमेदवारी कायम आहे. चामोर्शी नगर पंचायतीत १७ जागांसाठी एकूण ७७ उमेदवार आपले भाग्य आजमाविणार आहेत.
मुलचेरा नगर पंचायतीत एकूण ५५ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. २ उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतले. यामध्ये वॉर्ड क्र. ४ मधून बाबुराव पोती आलाम व वॉर्ड क्र. ११ मधून बंडू सुकाजी अलाम यांचा समावेश आहे. आता १७ जागांसाठी येथे ५३ उमेदवार उभे ठाकले आहेत.
अहेरी नगर पंचायतीमध्ये एकूण १०० उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. यापैकी १० उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतले. यामध्ये प्रभाग क्र. ९ मधून शंकर रत्नावार, प्रभाग क्र. ११ मधून सचिन सोनलवार, अमोल गुडेल्लीवार, प्रभाग क्र. १२ मधून शेख शब्बीर मुर्तीज, प्रभाग क्र. १३ मधून अब्दुल हुसैन अब्दुल रज्जाक, शेख आबाद मो. गौस, प्रभाग क्र. १६ मधून सुरेश राजम रामटेके, छत्रपती चांदेकर, भीमराव दहागावकर, श्रावण झाडे यांचा समावेश आहे. आता १७ जागांसाठी येथे ९० उमेदवार रिंगणात आहे.
या सहाही नगर पंचायतीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, दीपक आत्राम यांच्या नेतृत्वात आदिवासी विद्यार्थी संघाचे उमेदवार रिंगणात उभे आहे. अनेक ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढती होतील, असे चित्र आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष पहिल्या टप्प्यातील चामोर्शी व अहेरी या नगर पंचायतीच्या निवडणुकीकडे लागलेले आहे. येथे १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: 483 candidates in the field for 102 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.