सावकारांकडून ४८७३ शेतकऱ्यांनी घेतले २ काेटी ४४ लाखांचे कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:56 AM2021-01-08T05:56:41+5:302021-01-08T05:56:41+5:30
गडचिराेली : सहकार विभागाकडे आवश्यक दस्तावेज सादर करून रीतसर परवानगी मिळविणाऱ्या गडचिराेली जिल्ह्यातील नाेंदणीकृत ६० सावकारांकडून वर्षभरात डिसेंबर अखेरपर्यंत ...
गडचिराेली : सहकार विभागाकडे आवश्यक दस्तावेज सादर करून रीतसर परवानगी मिळविणाऱ्या गडचिराेली जिल्ह्यातील नाेंदणीकृत ६० सावकारांकडून वर्षभरात डिसेंबर अखेरपर्यंत ४ हजार ८७३ कर्जदार शेतकऱ्यांनी एकूण २ काेटी ४४ लाख ३६ हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गडचिराेली या कार्यालयाकडे सहा तालुक्यातील ६० सावकारांची परवानाप्राप्त सावकार म्हणून नाेंद आहे. यामध्ये गडचिराेली तालुक्यात ९, चामाेर्शी १, कुरखेडा १२, आरमाेरी १६, देसाईगंज तालुक्यात २२ सावकारांचा समावेश आहे. गडचिराेली तालुक्यातील सावकारांकडून ८७० शेतकऱ्यांना ३५.४२ लाख, चामाेर्शी तालुक्यात ७० सावकारांकडून १२.०३ लाख, कुरखेडा तालुक्यात १२ सावकारांकडून ९६२ कर्जदारांना ५२.११ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. आरमाेरी तालुक्यातील सावकारांकडून १ हजार ३४६ शेतकऱ्यांना ६३.३५ लाख तर देसाईंगंज तालुक्यातील शेतकऱ्यांकडून १ हजार ६२५ कर्जदारांना ८१.४५ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. सन २०१९-२० या वर्षात डिसेंबर २०२० अखेरपर्यंत वरीलप्रमाणे सावकारांकडून कर्ज वितरित करण्यात आले आहे.
बाॅक्स...
अनधिकृत सावकारी धंद्याबाबत तक्रारी नाही
गडचिराेली जिल्ह्यात राष्ट्रीयकृत, जिल्हा बँक, शहरात व ग्रामीण भागात असलेल्या विविध सहकारी पतसंस्थांमार्फत नियमानुसार कर्ज दिले जाते. याची सहकार विभागाकडे रीतसर नाेंद आहे. मात्र गडचिराेली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात कुठलाही परवाना नसलेले अनधिकृत सावकारी व्यवसाय करणारे अनेक लाेक आहेत. ते अवाढव्य व्याज आकारत आहेत. मात्र प्रशासनाकडे त्यापैकी कुणाबद्दलही अधिकृत तक्रार नाही.
बाॅक्स..
शेतकरी आत्महत्येची नाेंदच नाही
डाेक्यावर असलेल्या कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करतात. गडचिराेली जिल्ह्यात वर्षभरात कर्जामुळे दाेन ते तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. मात्र शेतकरी आत्महत्याची प्रशासनाची रीतसर नाेंद नाही. संबंधित कुटुंबीयांनी नाेंद केली नसल्याचे दिसून येते. घरगुती वाद, भांडण, दारूच्या आहारी जाऊन काही नागरिकांनी आत्महत्या केली आहे. कर्जाच्या कारणाने आत्महत्या केल्याचे ठाेस पुरावे नसल्याने नाेंद झाली नसल्याचे दिसून येते.
बाॅक्स...
अधिकृत सावकारांची व्याजदर आकारणी
अधिकृत सावकारांकडून तारण कृषी कर्ज घेतल्यास वर्षाला नऊ टक्के, बिगर तारणसाठी १२ टक्के, बिगर कृषी तारण कर्जासाठी १५ टक्के आणि बिगर कृषी बिगर तारणसाठी १८ टक्के व्याजदर आकारला जातो.