४०१ बाळांचा जन्म रुग्णवाहिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 06:00 AM2019-08-23T06:00:00+5:302019-08-23T06:00:33+5:30
मनोज ताजने । लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील रुग्णांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी रुग्णालय गाठताना मोठी ...
मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील रुग्णांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी रुग्णालय गाठताना मोठी कसरत करावी लागते. अनेक रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळण्याआधीच रुग्णवाहिकेत प्राण गमवावे लागतात, तर काही नवीन जीवही रुग्णवाहिकेत जन्म घेतात. गेल्या साडेपाच वर्षात ४०१ बाळांनी रुग्णवाहिकेतच जन्म घेतला आहे. १०८ क्रमांक डायल करून उपलब्ध होणाऱ्या आकस्मिक सेवेतील या रुग्णवाहिकांमुळे अनेक लोकांना जीवदान मिळाले आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या ‘१०८’ क्रमांक सर्वांच्या मुखपाठ झाला आहे.
गावात कोणालाही आकस्मिकपणे वैद्यकीय उपचाराची गरज असेल तर कोणत्या दवाखान्यात न्यावे लागेल हे बहुतेक लोकांना माहीत नाही. पण १०८ क्रमांकावरून रुग्णवाहिका बोलविल्यास हमखास संबंधित रुग्णाला योग्य त्या रुग्णालयात पोहोचविण्याची व्यवस्था होते, असा विश्वास नागरिकांमध्ये या आकस्मिक रुग्णवाहिकेने निर्माण केला आहे.
२०१४ पासून जुलै २०१९ या साडेपाच वर्षात गडचिरोली जिल्ह्यात ५३ हजार ४७३ रुग्णांना १०८ क्रमांकावरून येणाºया रुग्णवाहिकेची सेवा मिळाली आहे. त्यात ३६७८ रस्ते अपघातातील रुग्ण, १६२ जळालेले रुग्ण, १०७ ह्रदयविकाराचे रुग्ण, ९१२ पडून जखमी झालेले रुग्ण, ७६५ विषबाधेचे रुग्ण, ६९ वीज पडून जखमी झालेले रुग्ण, ३८६ सामूहिकरित्या जखमी झालेले रुग्ण आणि ३२ आत्महत्येचा प्रयत्न करणाºया रुग्णांचा समावेश आहे. या रुग्णवाहिकेची सेवा घेणारे सर्वाधिक ३३ हजार ५८८ रुग्ण विविध आजारांमुळे अचानक प्रकृती बिघडलेले आहेत.
जिल्ह्याच्या अनेक दुर्गम भागात रस्ते, पुलांअभावी रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही. त्यामुळे आजही रुग्णांना उलट्या खाटेवर टाकून आणावे लागते. त्यातच ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टरांची पदे नेहमीच रिक्त राहात असल्याने रुग्णांना गडचिरोलीला पाठविण्याचे प्रमाण जास्त आहे. ही स्थिती सुधारून रुग्णांना जवळच्या रुग्णालयात वेळेवर योग्य उपचार मिळण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची पदे भरण्याची गरज आहे.
गरोदर मातांचे होत आहे सर्वाधिक हाल
गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात गरोदर मातांचे सर्वाधिक हाल होतात. नियमित तपासणी होत नसल्यामुळे त्यांच्या पोटातील बाळाची स्थिती किंवा नवव्या महिन्यापर्यंत गरोदर महिलेच्या प्रकृतीची स्थिती कळत नाही. ऐन प्रसुतीच्या वेळी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले जाते, पण गरोदर महिलेची स्थिती पाहून तिला प्रसुतीसाठी ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा महिला व बाल रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला दिला जातो. गेल्या साडेपाच वर्षात अशा ११,६०२ गरोदर मातांची वाहतूक आकस्मिक सेवेतील रुग्णवाहिकेने केली. त्यात ४०१ मातांची प्रसुती रुग्णवाहिकेतच झाली.
जिल्ह्यातील खराब रस्त्यांमुळे बसणारे धक्के हेसुद्धा रुग्णवाहिकेतील प्रसुतींमागील एक कारण ठरले आहे. खराब रस्ते आणि लांब अंतरावर असणारी सरकारी रुग्णालये यामुळे रुग्णालयात पोहोचण्याआधी रुग्णवाहिकेतच गरोदर मातेची प्रसुती होते. २०१४ मध्ये ४५ महिलांची प्रसुती रुग्णवाहिकेत झाली. २०१५ मध्ये ७५ महिलांची, २०१६ मध्ये ९६ महिलांची, २०१७ मध्ये ७५ महिलांची, २०१८ मध्ये ९२ तर २०१९ मध्ये ३१ जुलैपर्यंत १८ महिलांची प्रसुती रुग्णवाहिकेत झाली आहे. या प्रसुतीदरम्यान रुग्णवाहिकेत १८ मातांना व्हेंटीलेटर लावण्यात आले.