सिरोंचा बसस्थानकासाठी पाच कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:20 AM2018-09-12T00:20:15+5:302018-09-12T00:21:13+5:30

सिरोंचा येथे बसस्थानक निर्मितीच्या हालचालींना वेग आला असून या बसस्थानकासाठी शासनाने पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी जागेची पाहणी केली.

5 crores sanctioned for Sironcha bus station | सिरोंचा बसस्थानकासाठी पाच कोटींचा निधी मंजूर

सिरोंचा बसस्थानकासाठी पाच कोटींचा निधी मंजूर

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी केली पाहणी : अंतिम डिझाईन तयार

लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : सिरोंचा येथे बसस्थानक निर्मितीच्या हालचालींना वेग आला असून या बसस्थानकासाठी शासनाने पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी जागेची पाहणी केली.
सिरोंचा हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असून गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती या तीन नद्यांच्या तिरावर वसले आहे. पुलाच्या बांधकामामुळे सिरोंचा हे तेलंगणा, महाराष्ट्र व छत्तीसगड या तीन राज्यांसाठी महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. तेलंगणा, महाराष्ट्र राज्यातून या ठिकाणी बसेस येतात. इंद्रावती नदीवरीलपुलाचे बांधकाम झाल्यानंतर छत्तीसगड राज्यातूनही बससेवा सुरू होईल. त्यामुळे सिरोंचा येथे प्रवाशांची नेहमीच गर्दी राहते. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भाविक व पर्यटक कालेश्वर मंदिर व मेडिगड्डा धरण पाहण्यासाठी येतात. त्यामुळे या ठिकाणी गर्दी उसळते. सिरोंचा येथे सर्व सोईसुविधा युक्त सुसज्ज बस स्थानक व्हावे, अशी मागणी येथील जनतेने अनेक वर्षांपासून केली होती.
पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे या संदर्भात भाजपा पदाधिकारी व सामन्य नागरिकांनी मागणी केली होती. त्याची दखल घेत पालकमंत्र्यांनी सिरोंचा येथे हायटेक बस स्थानक व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश मिळाले. सरकारने नुकतेच सिरोंचा येथे हायटेक बस स्थानक निर्मितीसाठी पाच कोटी रुपयांची निधी मंजूर केला आहे.
बसस्थानकाचे डिझाइन अंतिम केले असून, लवकरच या कामाचे ते भूमिपूजन होणार आहे. पालकमंत्री सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना बसस्थानकासाठी असलेल्या जागेची पाहणी केली. बांधकामाबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. लवकरच बांधकामाला सुरुवात होईल, असे आश्वासनही नागरिकांना दिले.
‘लोकमत’ने वेधले होते लक्ष
सिरोंचा या दोन राज्यांच्या सीमेवरील महत्वाच्या बस स्थानकात किती गैरसोयी आहेत याबद्दल लोकमतने काही दिवसांपूर्वीच सचित्र वृत्त प्रकाशित करून तेथील दुरवस्था निदर्शनास आणली होती. त्याची दखल घेत पालकमंत्र्यांनी नवीन बस स्थानकाच्या प्रस्तावाचा आणखी जोमाने पाठपुरावा करून त्याला मंजुरी मिळविली.

Web Title: 5 crores sanctioned for Sironcha bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.