रोहयोतून पाच लाख मनुष्य दिवस रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:19 AM2018-12-24T00:19:12+5:302018-12-24T00:19:48+5:30
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ५ लाख १८ हजार मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला आहे. इतर कोणत्याही योजनेपेक्षा सर्वाधिक रोजगार महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ५ लाख १८ हजार मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला आहे. इतर कोणत्याही योजनेपेक्षा सर्वाधिक रोजगार महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात शेती व्यतिरिक्त रोजगाराचे साधन नाही. सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने शेतीतही बारमाही रोजगार मिळत नाही. केवळ दोन ते तीन महिनेच रोजगार उपलब्ध होते. प्रती शेतकरी जमीनधारण क्षमता सुध्दा कमी असल्याने शेतकऱ्यांनाही मोलमजुरी करावीच लागते. इतर रोजगारांचे साधन उपलब्ध नसल्याने धानाचा हंगाम संपल्याबरोबर शेतकरी रोहयोच्या कामांची मागणी करतात. जवळपास चार ते पाच महिने रोहयोची कामे चालत असल्याने यातून मजुरांना रोजगार उपलब्ध होते.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख ७८ हजार जॉब कार्ड आहेत. त्यातील १ लाख २२ हजार जॉबकार्डधारक अॅक्टिव्ह आहेत. सदर मजूर वेळोवेळी रोजगाराची मागणी करतात. धानाचा हंगाम संपल्याबरोबर रोहयो कामांची मागणी होत असल्याची बाब प्रशासनाला माहित असल्याने आधीच कामांना मंजुरी देऊन रोजगाराची मागणी झाल्याबरोबर काम उपलब्ध करून दिले जाते. रोहयोच्या माध्यमातून प्रामुख्याने मजगी, शेततळे, विहिरी, तलाव, बोड्यांची दुरूस्ती, पांदन रस्त्यांची निर्मिती आदी कामे केली जातात. ही कामे पावसाळ्यानंतरच सुरूवात होतात. धानाचे पीक निघाल्यानंतर मजगीची कामे सुरू होतात. आता धानपीक निघाले असल्याने रोहयोची कामे करण्यास जमीन उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कामाची मागणी होताच काम उपलब्ध करून दिले जात आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या नियमानुसार प्रत्येक कुटुंबाला वर्षभरातून किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून द्यावा लागतो. १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला नसताना एखाद्या मजुराने कामाची मागणी केल्यास व काम उपलब्ध नसल्यास बेरोजगारी भत्ता सुध्दा द्यावा लागतो. गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ९९१ कुटुंबांना यावर्षीच्या आर्थिक वर्षात १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. २०१७-१८ या वर्षात ८ हजार ६७६, २०१६-१७ या वर्षात ७ हजार ६४७ कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला होता. २०१५-१६ मध्ये सर्वाधिक १५ हजार ८३० कुटुंबांना १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध झाला.
कामाची मागणी वाढली
धानाचे पीक निघाल्याने आता ग्रामीण व दुर्गम भागातील मजुरांना रोजगाराचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. त्यामुळे कामाची मागणी वाढली आहे. तेंदूपत्त्याचा हंगाम सुरू होईपर्यंत मजूर आता रोहयो कामांवर राहणार आहेत. रोहयोच्यामाध्यमातून विशेष करून मजगीची कामे केली जात असल्याने धानाच्या बांध्या आता रिकाम्या झाल्याने रोहयोची कामे करण्यास प्रशासनालाही सोयीचे झाले आहे. यावर्षी काही भागात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने रोहयो कामांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. गचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोहयोच्या कामांची मागणी होत असल्याने त्यानुसार प्रशासन नियोजन करते.