शेवट गोड! 20 लाखांचे बक्षिस असलेल्या 5 नक्षलवाद्याचे समर्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 09:42 PM2018-08-03T21:42:11+5:302018-08-03T21:44:15+5:30
अनेक खून, जाळपोळ आणि पोलिसांशी झालेल्या चकमकीत सहभागी असणाऱ्या पाच नक्षलवाद्यांनी शुक्रवारी गडचिरोलीत आत्मसमर्पण केले. या पाच नक्षलांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या सर्वांवर मिळून २० लाख रुपयांचे बक्षीस होते.
गडचिरोली : अनेक खून, जाळपोळ आणि पोलिसांशी झालेल्या चकमकीत सहभागी असणाऱ्या पाच नक्षलवाद्यांनी शुक्रवारी गडचिरोलीत आत्मसमर्पण केले. या पाच नक्षलांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या सर्वांवर मिळून २० लाख रुपयांचे बक्षीस होते. नक्षल सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी मिळालेल्या या यशाने पोलिसांचा हुरूप वाढला आहे. राज्य शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचे फायदे, नागरिकांकडून नक्षल चळवळीला मिळत नसलेले पाठबळ, पोलिसांची वाढती आक्रमकता आणि नक्षल चळवळीतील भटकंती व हिंसाचाराला कंटाळून या नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.
गडचिरोलीत गुरूवारीच रुजू झालेले पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, हरी बालाजी यांच्यासमोर या पाच नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यापैकी साईनाथ व दिना हे दोघे पती-पत्नी आहेत. नक्षलींच्या शहीद सप्ताहाचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. या सप्ताहात कोणतीही हिंसक घटना घडविण्यात यश न आलेल्या नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणामुळे जबर हादरा बसला आहे.
यांनी सोडली नक्षल चळवळ
साईनाथ उर्फ सत्तू चुक्कू पोदाळी (२६) हा ऑक्टोबर २००९ मध्ये कसनसूर दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन प्लाटून क्र.३ तसेच गट्टा दलम सदस्य म्हणून कार्यरत होता. ६ पोलीस-नक्षल चकमकीत त्याचा सहभाग होता. त्याच्यावर २ खून, १ जाळपोळ केल्याचे गुन्हे होते. त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस होते.
दिना उर्फ सन्नी मंगलू पुंगाटी (२०) ही नोव्हेंबर २०१४ मध्ये जुगारगुडा (छत्तीसगड) दलममध्ये भरती होऊन भामरागड दलम, गट्टा दलम मध्ये सदस्य होती. एका चकमकीसह तिच्यावर एका जाळपोळीचा गुन्हा आहे. तिच्यावरही २ लाख रुपयांचे बक्षीस होते.
सुशिला उर्फ शिला उर्फ ज्योती उर्फ मदनी लक्ष्मण तलांडी (२८) ही जून २००१ मध्ये पेरमिली दलममध्ये भरती झाली. २००३ मध्ये तिची बदली डिवीजन सीएनएम टीममध्ये होऊन नंतर अहेरी एरिया, इंद्रावती एलओएस (छत्तीसगड) मध्ये एसीएम पदावर कार्यरत होती. तिचा १० चकमकीत सहभाग होता. ७ खून आणि एका जाळपोळीचा तिच्यावर गुन्हा असून ६ लाखांचे बक्षीस होते.
राजेश उर्फ राजू याकूब कुजुर (३६) हा डिसेंबर २००६ मध्ये कसनसूर दलममध्ये भरती होऊन २०१० मध्ये बढती होऊन दक्षिण डिव्हीजन डॉक्टर टीममध्ये, २०११ पासून पीसीसीएम पदावर कार्यरत होता. त्याचा १९ चकमकीत सहभाग असून २ खून व एका जाळपोळीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर ६ लाखांचे बक्षीस होते.
मंगेश उर्फ विजय बाजू गावडे (३२) हा नोव्हेंबर २००९ मध्ये पेरमिली दलममध्ये दाखल झाला. २०१० पासून प्लाटून १४ मध्ये पीपीसीएम पदावर होता. १० चकमकीत त्याचा सहभाग होता. त्याच्यावर ७ खून, २ जाळपोळीचे गुन्हे आहेत. त्याच्यावर ४ लाखांचे बक्षीस होते.