अपेक्षित प्रमाणाच्या ६३ टक्के पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 11:48 PM2019-07-27T23:48:37+5:302019-07-27T23:49:18+5:30
मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली असली तरी अपेक्षित पावसाच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमीच झाला आहे. २७ जुलैपर्यंत ६३७.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात ४०२.१ मिमी पाऊस पडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली असली तरी अपेक्षित पावसाच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमीच झाला आहे. २७ जुलैपर्यंत ६३७.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात ४०२.१ मिमी पाऊस पडला आहे.
यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दगा दिला आहे. अगदी सुरुवातीला काही दिवस पाऊस झाला नाही. त्यानंतर सतत १० दिवस पाऊस पडला. त्यामुळे पेरण्या व धानाचे पऱ्हे टाकण्याचे काम थांबले होते. त्यानंतर पावसाने सुमारे १५ दिवस दडी मारली होती. धानाचे पऱ्हे व इतर पिके पावसाअभावी करपण्यास सुरुवात झाली होती. सुदैवाने पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने धानाचे पऱ्हे व इतर पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तरीही अपेक्षित पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात पाऊस कमी प्रमाणातच झाला आहे. १ जून ते २७ जुलै पर्यंत ६३७.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ४०२.१ मिमी एवढाच पाऊस पडला. अपेक्षित पावसाच्या यावर्षी पडलेल्या पावसाची टक्केवारी ६३ एवढी आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने तलाव, बोड्यांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाला नाही. त्यामुळे धानपीक उत्पादक शेतकरी अजुनही चिंतेत आहे.
धान पिकाला शेवटपर्यंत पाण्याची गरज भासते. त्यामुळे तलाव, बोड्या न भरल्यास सिंचनाची अडचण जाणार आहे.
चामोर्शी तालुक्यात सर्वात कमी पाऊस
१२ तालुक्यांपैकी चामोर्शी तालुक्यात यावर्षी सर्वात कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या तालुक्यात यावर्षी २७ जुलैपर्यंत केवळ २५२.७ मिमी पाऊस पडला आहे. भामरागड तालुक्यात सर्वाधिक ५५८.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गडचिरोली तालुक्यात ३७१.४ मिमी, धानोरा ४३८ मिमी, मुलचेरा ३०७ मिमी, देसाईगंज ६६७ मिमी, आरमोरी ४१७ मिमी, कुरखेडा ४४२ मिमी, कोरची ४६३ मिमी, अहेरी ४४५ मिमी, सिरोंचा ३१७ मिमी, एटापल्ली ४४५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्वच तालुक्यांमध्ये अपेक्षित पावसाच्या कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे, चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र याच तालुक्यात कमी पाऊस झाला आहे.
वार्षिक सरासरीच्या २९ टक्के पडला पाऊस
गडचिरोली जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत सरासरी १३५४.७ मिमी पाऊस पडते. यावर्षी २७ जुलैपर्यंत ६३७.८ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. एकूण वार्षिक सरासरीच्या केवळ २९.७ मिमी पाऊस झाला आहे. सुमारे ७० टक्के पाऊस अजून पडणे बाकी आहे. विशेषत: जुलै, आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक पाऊस पडत असल्याचा अनुभव आहे. मात्र यावर्षी जुलै महिन्यातील बहुतांश दिवस कोरडे गेले. त्यामुळे आॅगस्ट महिन्यात किती पाऊस पडते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पुढील महिन्यात पाऊस न झाल्यास धान पिकाला धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहे.