'एकास 5 वर्षाचा मुलगा तर दुसऱ्याला 3 वर्षांची चिमुकली', बुलडाण्याचे दोघे शहीद 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 09:34 PM2019-05-01T21:34:37+5:302019-05-01T21:35:13+5:30

देऊळगाव राजा तालुक्यातील आळंद येथील शहीद जवान सर्जेराव उर्फ संदीप एकनाथ खार्डे हे पोलीस दलात दोन मार्च २०११ मध्ये भरती झाले होते.

'5 year old son and others to 3 year old girl, story of gadchiroli martyr from Buldhana district | 'एकास 5 वर्षाचा मुलगा तर दुसऱ्याला 3 वर्षांची चिमुकली', बुलडाण्याचे दोघे शहीद 

'एकास 5 वर्षाचा मुलगा तर दुसऱ्याला 3 वर्षांची चिमुकली', बुलडाण्याचे दोघे शहीद 

googlenewsNext

बुलडाणा : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलींनी महाराष्ट्र दिनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात शहीद झालेल्या जवानांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सर्जेराव उर्फ संदीप एकनाथ खार्डे (३०, आळंद, ता. देऊगाव राजा) आणि मेहकर येथील राजू नारायण गायकवाड (३२) या जवांनांचाही समावेश आहे. गडचिरोलीतील कुरखेड्यापासून सहा किमी अंतरावर असलेल्या जांभूरखेडा येथे सी ६० या पथकामध्ये समावेश असलेले हे दोन्ही जवान आपल्या सहकाऱ्यांसह खासगी वाहनाने जात असताना नक्षलींनी भूसुरूंगाचा स्फोट केला होता, त्यात हे दोघे ठार झाले.

शहीद शहीद राजू गायकवाड यांचे आई-वडील घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगोलग गडचिरोलीकडे रवाना झाले आहे. मेहकर शहरातील अण्णाभाऊ साठे नगरमधील वॉर्ड क्र. सात मध्ये ते कुटुंबियांसह वास्तव्यास होते. दोन वर्षापूर्वीच त्यांचा मोठा भाऊ हा वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी आजारपणात मृत्यूमुखी पडला होता. शहीद राजू गायकवाड हे २००९ मध्ये पोलीस दलात भरती झाले होते. त्यांना पाच वर्षाची मुलगी (गायत्री), आठ महिन्याचा एक मुलगा (समर्थ) व बराच मोठा आप्त परिवार आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथील त्यांची सासुरवाडी असून १५ फेब्रुवारी २०१३ मध्ये त्यांचा विवाह झाला होता.

दरम्यान, देऊळगाव राजा तालुक्यातील आळंद येथील शहीद जवान सर्जेराव उर्फ संदीप एकनाथ खार्डे हे पोलीस दलात दोन मार्च २०११ मध्ये भरती झाले होते. पत्नी स्वाती, एक मुलगी नयना (३), आई, वडील व एक भाऊ असा त्यांचा परिवार आहे. दरम्यान, सकाळपासून पतीचा फोन लागत नसल्यामुळे पत्नी स्वाती हीने आळंद येथे कुटुंबियांना माहिती दिली होती. तेवढ्यात दृकश्राव्य माध्यमावर गडचिरोलीतील नक्षली हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर संदीप खार्डेचे कुटुंबीय व नातलग हे गडचिरोलीकडे रवाना झाले होते.
दरम्यान, या दुर्देवी घटनेची शहीद जवानांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे. वरिष्ठ पातळीवरून येणार्या सुचनेनुसार शहीद जवानांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्याबाबत अद्याप स्पष्ट सूचना आलेल्या नाहीत. गडचिरोली नियंत्रण कक्षासह तेथील अधिकाऱ्यांच्या आपण संपर्कात असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

जिल्ह्यावर दु:खाचा डोंगर
गेल्या महिनाभरापूर्वीच पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा नियतीने बुलडाणा जिल्ह्यातील दोन कर्तबागर जवान हिरावून घेतले आहे. त्यामुळे जिल्ह्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून सोशल मीडियातून शहीद जवानांप्रती शोकसंवेदना व्यक्त करीत त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.

Web Title: '5 year old son and others to 3 year old girl, story of gadchiroli martyr from Buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.